सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांची डॉक्टरांशी वादावादी
By Admin | Updated: July 17, 2015 22:48 IST2015-07-17T22:48:21+5:302015-07-17T22:48:21+5:30
वैभववाडी रुग्णालयातील समस्या : 'आरपीआय'चा आंदोलनाचा इशारा

सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांची डॉक्टरांशी वादावादी
वैभववाडी : ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे १ आॅगस्टपूर्वी रुग्णालयातील गैरसोयी दूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआयने दिला आहे. दरम्यान पदांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या मुद्द्यावरुन तात्पुरत्या नियुक्तीवर आलेले डॉ. रियाज अत्तार यांच्याशी सत्यशोधक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी वादावादी झाली.वैभववाडी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. तसेच रक्त व एक्स रे तपासणी केली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची योग्य निदानाअभावी गैरसोय होत आहे. शिवाय आर्थिक भुर्दंड बसत आहे. पावसाळा सुरु असल्याने साथीचे आजार फैलावण्याची शक्यता असताना रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल सत्यशोधक संघटनेचे सुदीप कांबळे, सुभाष कांबळे, कृष्णा कांबळे आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, रवींद्र पवार आदींनी डॉ. अत्तार याची भेट घेऊन रुग्णालयातील गैरसोयींबद्दल विचारणा केली. त्यावेळी डॉ. अत्तार नुकतेच महिलेची प्रसुती करून आले होते. रुग्णालयातील गैरसोयींबाबत डॉ. अत्तार यांना सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांनी विचारले असता काहीकाळ वादावादी झाली. आपण दोनच दिवसांपूर्वी इथे आलो आहोत. त्यामुळे इथल्या रुग्णालयाच्या परिस्थितीबद्दल मला काहीच माहित नाही, असे डॉ. अत्तार यानी सांगितले. त्यामुळे सत्यशोधकचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यावेळी आपण उद्यापासून रुग्णालयात येणारच नाही, अशी भूमिका डॉ. अत्तार यांनी घेतली. डॉ. अत्तार यांच्याशी झालेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीवर सुदीप कांबळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक योगेश बिलोलीकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावेळी पुढील आठवड्यात वैभववाडी रुग्णालयाला भेट देऊन तेथील समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्याचे कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरुन अत्यावशक सुविधा १ आॅगस्टपुर्वी उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे. तहसीलदारांना निवेदन देताना आरपीआय जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, प्रथमेश पेडणेकर, रुपेश कांबळे, गौतम गोळवणकर आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)