कंत्राटी कामगारांचे उपोषण सुरूच
By Admin | Updated: November 16, 2014 00:23 IST2014-11-16T00:21:25+5:302014-11-16T00:23:27+5:30
तिलारी प्रकल्प : संदेश पारकर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

कंत्राटी कामगारांचे उपोषण सुरूच
दोडामार्ग : अचानक कमी करण्यात आलेल्या तिलारी प्रकल्पावर कं त्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुनश्च सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कोनाळकट्टा येथे कंत्राटी कामगारांचे सुरू असलेले उपोषण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वेळप्रसंगी कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभारू, अशी ग्वाही त्यांनी उपोषणकर्त्यांना दिली.
तिलारी प्रकल्पाला सन १९८५ च्या दरम्यान सुरुवात झाली. त्यानंतर १९८५ ते १९९२ सालापर्यंुत हजेरी पटावर कंत्राटी कामगारांकडून प्रकल्पाची कामे करण्यात आली. हजेरीपट बंद झाल्यानंतर ठेकेदारी पध्दतीने ही कामे करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडूनच मानधन दिले जाई.
मात्र, या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याची व ते राहत असलेल्या वसाहती खाली करण्याची नोटीस प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे आपल्या न्यायहक्कांसाठी या कंत्राटी कामगारांनी तिलारी प्रकल्पाच्या कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. हे उपोषण शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठींबा दिला. तिलारी धरण पूर्ण घेण्यामागे कंत्राटी कामगारांचे योगदान व त्याग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा त्याग वाया जावू दिला जाणार नाही. कामगारांच्या हक्कासाठी प्रसंगी आंदोलन उभारण्याची वेळ आली, तर ते देखील उभारले जाईल, अशी ग्वाही त्यांनी कंत्राटी कामगारांना दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, मनसेचे उपतालुकाध्यक्ष मायकल लोबो, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमेश दळवी, दोडामार्ग काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप गवस, बाबा टोपले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)