फसवणुकीबाबत संपर्क साधा
By Admin | Updated: September 7, 2015 23:22 IST2015-09-07T23:22:08+5:302015-09-07T23:22:08+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : सिंधुदुर्गनगरीतील आठवडाबाजार अधिकृत

फसवणुकीबाबत संपर्क साधा
सिंधुदुर्गनगरी : ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील आठवडा बाजार अधिकृत आहे. त्या पाठीमागे वाणिज्य विकासासाठी भूखंडाचे वितरण खासगी विकासकास करण्यात आले असून त्याबद्दल ग्राहकांना शंका असेल अथवा फसवणूक होत असेल तर अशा ग्राहकांनी तत्काळ सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
सोमवारी जिल्हाधिकारी दालनात जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक माहिती अधिकारी अर्चना माने उपस्थित होते.महामार्गालगत सिंधुदुर्गनगरी ओरोस प्राधीकरण क्षेत्रात दोन ठिकाणी मल्टीप्लेक्स मॉल विकसित करण्यासाठी टेंडर काढून खासगी विकासकांना देण्यात आले आहे. या भूखंडालगत ओढे असून त्याचा प्रवाह बदलू नये तसेच एका बिल्डर्सकडून भविष्यात आठवडा बाजार हटविण्यात येणार आहे असे ग्राहकांना सांगून गाळ्याचे बुकींग करण्यात येत आहे. मात्र तो आठवडा बाजार अधिकृत असून त्यावर शासनाचा लाखो रुपये खर्च झाला आहे. त्यामागील भूखंड खासगी विकासकांना देण्यात आला आहे. त्यातील विकासाचा आराखडा मंजूर प्राधीकरण करणार आहे. जर ग्राहकांच्या काही शंका असतील तर त्या ग्राहकांनी थेट प्राधीकरण प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तिलारी प्रकल्पबाधित कुटुंबांची संख्या ९४७ एवढी असून प्रत्येक कुटुंबाला ५ लाख प्रमाणे ४७ कोटीचे अनुदान दोन्ही राज्यांकडून वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या कुटुंबाची बँक खाते घेणे सुरु झाले आहे. गोवा सरकारने ३४ कोटी ८९ लाख यासाठी मंजूर केले असून ही रक्कम थेट त्या कुटुंबाच्या खात्यावर जमा होणार आहे तर महाराष्ट्र शासन १२ कोटी हिस्सा देणार असून तो निधी प्राप्त होताच ही रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. तसेच नोकरीसाठी देण्यात आलेले प्रकल्पग्रस्त दाखले आता जमा करून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू नुकसानीचा अहवाल पाठविताना जिल्ह्याचा आणि तालुक्याच्या अहवालात विसंगती आहे. तसेच देवगड तालुक्यात सातबारावर दिसणाऱ्या पोट खराबा क्षेत्रातही लागवड झालेली आहे. मात्र लागवडीखालील ते क्षेत्र सातबारावर दिसत नसल्याने त्या प्रकरणात नुकसान भरपाई मिळत नाही. आता क्षेत्रातील विसंगती दूर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. मात्र तोपर्यंत नुकसानग्रस्त सर्व क्षेत्र गृहित धरून निधी उपलब्ध झालेल्या प्रमाणात वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिली. (प्रतिनिधी)
लोकशाही दिनात २ तक्रारी : अनिल भंडारी
तिलारी प्रकल्पातील गोपळ सखाराम नाईक यांनी आपल्याला तीन मुलगे असून त्यापैकी एकाच्या नावावर प्रकल्पग्रस्ताचा दाखला आहे. त्यामुळे फक्त एकट्याच मुलाला एकरकमी नुकसान भरपाईची रक्कम अदा करू नये. कारण तो मुलगा आपला सांभाळ करत नाही अशी तक्रार दिली आहे.
तसेच कोर्ले धरणग्रस्त अनिल गंगाराम कुलकर्णी यांनी आपल्या झाडांची ९२ हजार रूपये नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार केली आहे. तर एक तक्रार निकषात बसणारी नसल्याने ती फेटाळण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.