म्होरका गारद करण्याचे षड्यंत्र!
By Admin | Updated: April 9, 2015 00:02 IST2015-04-08T23:28:18+5:302015-04-09T00:02:12+5:30
चोरगे यांचा टोला : जिल्हा बँकेला साडेतेरा कोटींचा नफा

म्होरका गारद करण्याचे षड्यंत्र!
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत म्होरक्याला त्रास द्यायचा, गारद करायचे हेच विरोधकांचे षड्यंत्र आहे. त्यासाठी दुसऱ्याच्या खांद्याचा वापर केला जात आहे. मात्र, विरोधकांचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असा टोला जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी लगावला.जिल्हा बँकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षातील प्रगतीचा आढावा त्यांनी पत्रकार परिषदेत घेतला. गेल्या वर्षभरात जिल्हा बँकेने २० कोटींचा ढोबळ नफा मिळवला असून, निव्वळ नफा १३ कोटी ५३ लाख एवढा आहे. गतवर्षी ३५ कोटी ९४ लाख असलेले (पान १ वरून) भागभांडवल या संपलेल्या आर्थिक वर्षात ३९ कोटी ५४ लाखापर्यंत पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ९०५ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. क्रॉस एनपीए आधीच्या २.७५ टक्केवरून ३.२३ टक्क्यांवर आला आहे. नेट एनपी गेल्या तीन वर्षांपासून सतत शून्य टक्के राखणे शक्य झाले आहे. त्यामुळे जे कोणी आरोप करीत आहेत, त्यांच्यासाठी हे स्वच्छ, स्पष्ट चित्र आपण मांडत असल्याचे ते म्हणाले.
सहकार पॅनेलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांचे उमेदवार असून या पॅनेलच्या विरोधात शिवसेना शिवसंकल्प पॅनेलद्वारे सर्व जागा लढवित आहे. बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेचा विषय आता संपलेला आहे. त्यामुळे निवडणूक अटळ आहे आणि त्यासाठी सत्ताधारी सहकार पॅनेल सज्ज आहे. पुन्हा सहकार पॅनेलच जिल्हा बॅँकेत सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
शरद पवार यांचा निरोप
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेल्या बाळ बेलोसे यांच्याकडे पवार यांनी जिल्हा बँक निवडणुकीची चौकशी केली. सहकार पॅनेलने ही निवडणूक जिंकायलाच पाहिजे, असा निरोप डॉ. चोरगे यांना द्या, असे पवार यांनी सांगितल्याची माहिती बेलोसे यांनी आपल्याला दिल्याचे डॉ. चोरगे म्हणाले. राष्ट्रवादीतीलच कोणी बँकेविरोधात व आमच्या विरोधात बोलत असेल, तर त्याबद्दल पक्षनेत्यांकडे तक्रार करणे आपणास आवश्यक वाटत नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. मात्र अत्यंत खालच्या पातळीवर येऊन जे आरोप होत आहेत, त्यामुळे नक्कीच आपण व्यथित झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्या अठरा फाईलींचे खंड प्रसिद्ध करावेत
जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत आपणाकडे १८ फाईली असल्याचे असंतुष्ट नेते सांगत आहेत, परंतु मुळात काहीच घडलेले नाही तर या फायलींचा उपयोगच काय? संबंधितांनी आता त्याचे १८ खंड प्रकाशित करावेत, असा टोलाही डॉ. चोरगे यांनी लगावला. गोविंदराव निकम यांच्या पाठीत चोरगे यांनी खंजीर खुपसला असे हा नेता म्हणतो. हे आठ वर्षांनंतर निवडणुकीच्या वेळीच यांना का आठवले? असा सवालही त्यांनी केला. सापाच्या शेपटीवर मी पाय दिला आहे, असेही या नेत्याने म्हटले. हे खरोखरच माहीत नव्हते, नाहीतर आधीच सावध राहिलो असतो, असेही चोरगे खोचकपणे म्हणाले.