काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: October 30, 2015 23:11 IST2015-10-29T23:47:03+5:302015-10-30T23:11:02+5:30
रणजीत देसाई : रस्त्यांची डागडुजीसाठी आठ दिवसात करण्याची मागणी

काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
कुडाळ : तालुक्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी येत्या आठ दिवसात झाली नाही तर संपूर्ण तालुक्यात एकाचवेळी राष्ट्रीय काँगे्रसच्यावतीेने दिवाळीपूर्वी चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेतून दिला.कुडाळ राष्ट्रीय काँगे्रस कार्यालय येथे तालुक्यातील काँगे्रसचे नेते व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, काँगे्रस विभागीय अध्यक्ष विनायक राणे, काँगे्रस तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, लोकसभा युवकचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, अस्मिता बांदेकर, कुडाळ शहर काँगे्रस अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक काँगे्रसचे अध्यक्ष सुनील बांदेकर, प्रसाद पडते, अनिल खडपकर उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले, महामार्गावरील शौचालयाची इमारत ही शहरात येणाऱ्या राज्यमार्गाच्या अगदी लगत बांधण्यात येत होती. त्यामुळे नगरपंचायतीच्या निकषानुसार शहराचा विकास करताना रस्ता रुंदीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात ही इमारत पाडावी लागणार आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम राज्यमार्गापासून ३७ मीटरपासून पुढे करावे, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एस. झेंडे यांना दिले होते. मात्र, या इमारतीचे काम रस्त्यापासून अगदी लगत सुरू झाले असून ५० टक्के काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तर तालुका डोंगरी भागात येत असल्याने रस्त्यापासून ५ मीटर अंतराच्या बांधकाम करता येऊ शकते, असे लेखी पत्र कुडाळ तालुका काँग्रेसला सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता झेंडे यांनी दिले आहे. यामुळे तालुक्यातील बऱ्याच जणांची रस्त्या लगतची बांधकामे वाचतील. जमीन वाचेल, कोणतीच बांधकामे तोडावी लागणार नाहीत, असे देसाई म्हणाले.
यावेळी कुडाळच्या उपअभियंता झेंडे यांनी ५ मीटर अंतराबाहेर बांधकाम हे लेखी पत्र दिले खरे मात्र प्रांताधिकारी, तहसील तसेच इतर बांधकामांना परवानग्या देणाऱ्या सर्व कार्यालयातून ३७ मीटरच्या बाहेरच बांधकामास परवानगी देण्याचा निर्णय आजपर्यंत तरी आहे. त्यामुळे रस्त्यापासून ५मीटर बाहेर बांधकाम करता येते, हा निकष झेंडे यांनी कसा काढला, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला.(प्रतिनिधी)
दिवाळीपूर्वी चक्काजाम : रस्ता दुरुस्तीची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाने खराब झालेल्या तालुक्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी गणेश चतुर्थीपूर्वी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही रस्त्यांची डागडुजी झाली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात रस्त्याची डागडुजी झाली नाही तर संपूर्ण तालुक्यातील सर्व रस्त्यावर एकाचवेळी राष्ट्रीय काँगे्रस चक्काजाम आंदोलन दिवाळीच्या तोंडावर छेडणार, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला देसाई यांनी दिला. यावेळी कुडाळ तालुका काँगे्रसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.