काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला
By Admin | Updated: May 28, 2015 01:04 IST2015-05-28T01:04:03+5:302015-05-28T01:04:16+5:30
शेकडो कार्यकर्ते आंदोलनात : पालकमंत्र्यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणला

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोदामामध्ये सडत पडलेल्या भातामुळे नवीन भात खरेदी थांबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रीय काँग्रेसने ‘भात गोदाम खाली करा’ आंदोलन केले. कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली येथील गोदामातील भात खाली करण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटकाव केल्याने महामार्गावर ठाण मांडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे तब्बल दीड तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह काँगे्रस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमधून कणकवली पोलीस स्थानकात आणले.
शहरातील गांगो मंदिर येथून जानवली येथील भात गोदामापर्यंत काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आमदार नीतेश राणे, सतीश सावंत, संदेश सावंत, मधुसुदन बांदिवडेकर, संतोष कानडे, शरद कर्ले, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, बाळा जठार, संदीप मेस्त्री, रमाकांत राऊत, संदीप सावंत, महेश गुरव, लक्ष्मण घाडीगावकर, राजेश रावराणे, महेंद्र रावराणे, आस्था सर्पे, काँगे्रस देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, भालचंद्र साठे, संदेश पटेल, दिगंबर पाटील, विठ्ठल देसाई, सुरेश सावंत, विभावरी खोत, श्रीया सावंत, राजश्री पवार, स्नेहलता चोरगे, मेघा गांगण, कन्हैय्या पारकर, रूपेश नार्वेकर, किशोर राणे आदी काँगे्रस पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांसह सहभागी झाले होते. १२ वाजण्याच्या सुमारास जानवली येथील गोदामाजवळ मोर्चाने पोहोचलेल्या आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडत गोदामाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रतिकार केल्यानंतर जोपर्यंत भात खरेदीविषयी जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही, असा पवित्रा घेतला. तसेच आमदार नीतेश राणे यांच्यासह आंदोलकांनी मुंबई- गोवा महामार्गावर ठाण मांडले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी तसेच गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. (वार्ताहर)
मोर्चासह जानवली येथील गोदामाकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या तसेच महायुती शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये ‘हे सरकार कोणाचे, नाही आमच्या कामाचे’, ‘पालकमंत्री मुर्दाबाद’, ‘आता कुठे गेला वैभव, भात खरेदी करून दाखव’ अशा घोषणांचा समावेश होता. कार्यकर्त्यांनी घोषणा लिहिलेले फलकही हातात धरले होते.
कडक उन्हातही कार्यकर्त्यांचा जोश
भात गोदाम खाली करण्याच्या आंदोलनामध्ये कणकवली, देवगड वैभववाडी या तीन तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता. कडक उन्हात जोरदार घोषणाबाजी करीत हे आंदोलक जानवली गोदामापर्यंत पायी चालत गेले.
शहरातील गांगो मंदिरपासून आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोर्चाला प्रारंभ झाला.
मोर्चाने आलेले आंदोलक जानवली भात गोदामाजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स पाडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी गोदामात जाण्यास अटकाव केल्यानंतर आमदार नीतेश राणे यांच्यासह आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्गावर ठाण मांडत रास्ता रोको केला.
महामार्गावर अज्ञाताने मारूती कार पेटविल्यामुळे अनेक वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
पोलिसांनी महामार्गावर ठाण मांडलेल्या आंदोलकांना अटक करून पोलीस व्हॅनमध्ये घातले.
वनविभागाच्या कार्यालयासमोरील महामार्गावर पोत्यातील भात ओतून आंदोलकांनी पुन्हा महामार्ग रोखून धरला.
पोलिसांनी महामार्गावरील भाताची पोती हटवून मार्ग मोकळा केला. तसेच आंदोलकांना कणकवली पोलीस स्थानकात नेले.