दोडामार्गात काँग्रेसला धक्का
By Admin | Updated: September 13, 2014 23:48 IST2014-09-13T23:48:41+5:302014-09-13T23:48:41+5:30
श्रीपाद नाईक यांची उपस्थिती : दोन पंचायत समिती सदस्यांचा भाजपात प्रवेश

दोडामार्गात काँग्रेसला धक्का
कसई दोडामार्ग : पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य महेश गवस व उपसभापती आनंद रेडकर या दोघांनी आज शनिवारी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज दोडामार्ग येथे पत्रकार परिषदेत दिली.
दोडामार्ग येथील भाजपा संपर्क कार्यालयात आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, प्रवीण गवस आदी उपस्थित होते.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत गोवा व कर्नाटक सीमेवर शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय काँगे्रसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर यांनी कुठलीही मागणी वा अट न ठेवता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून गवस व रेडकर यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे दोडामार्ग पंचायत समितीतील महायुतीची ताकद वाढली आहे.
दोडामार्ग पंचायत समिती सभापती, उपसभापती कोण होणार याचा निर्णय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे रविवारी घेणार आहेत. आनंद रेडकर व महेश गवस यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. गवस व रेडकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे काळसेकर यांनी सांगितले.
महेश गवस व आनंद रेडकर यांच्या भाजपा प्रवेशावेळी राजन म्हापसेकर, बांदा सरपंच शीतल राऊळ, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, दोडामार्ग शहराध्यक्ष चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)