काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांचा राजीनामा
By Admin | Updated: November 6, 2014 00:19 IST2014-11-05T23:15:36+5:302014-11-06T00:19:48+5:30
प्रदेशाध्यक्षांना सादर : पराभवाची नैतिक जबाबदारी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांचा राजीनामा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये तीनपैकी दोन मतदारसंघांत काँग्रेसचा पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा काँगे्रस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. पदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेस पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी आज, बुधवारी ओरोस येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली. यावेळी सावंत म्हणाले की, २८ जुलै २०१० रोजी काँग्रेस नेते नारायण राणे व माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्यावर सोपविली. गेली चार वर्षे राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम करीत आहे. या काळात काँग्रेस पक्षाच्या संघटना बांधणीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांचा पराभव झाला. यावेळी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचे निश्चित केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पराभवाची पोकळी भरून काढण्याची आशा होती. ही आशाही फोल ठरली. विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघात आ. नीतेश राणे यांचा विजय झाला, परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम केले, त्या नारायण राणे यांचा पराभव झाला. त्याशिवाय सावंतवाडी मतदारसंघातूनही काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत गावडे यांचाही पराभव झाला. जिल्ह्यातील तीनपैकी दोन मतदारसंघांत काँग्रेसचा पराभव झाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती यावेळी सतीश सावंत यांनी दिली.
जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे चांगले सहकार्य लाभले. नारायण राणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे प्रेम मिळाले. म्हणून चार वर्षे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकलो.