जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By Admin | Updated: October 21, 2014 00:21 IST2014-10-21T00:18:00+5:302014-10-21T00:21:27+5:30
विधानसभा निकाल : नारायण राणेंचा पराभव जिव्हारी

जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर काँग्रेस गोटात राजीनामा सत्र सुरूझाले असून, काँग्रेस नेते नारायण राणे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातील उमेदवार काँग्रेस नेते नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सोमवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. अन्य पदाधिकारीही राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला असला तरी दोन जागा जमविल्या आहेत. त्यामध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांचा पराभव झाला आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघाची प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणारे रणजित देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द केला आहे. (प्रतिनिधी)