भ्रष्टाचार काँग्रेसने पोसला
By Admin | Updated: July 27, 2014 00:38 IST2014-07-27T00:36:48+5:302014-07-27T00:38:10+5:30
वामन मेश्राम : महाजागरणअंतर्गत कणकवलीत मेळावा

भ्रष्टाचार काँग्रेसने पोसला
कणकवली : स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉँग्रेसने भ्रष्टाचार आणि जातीयवादाच्या आधारे निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच विशिष्ट जातीला प्राधान्य देत बहुजन समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे कारस्थान कॉँग्रेसने केले. आम्ही या देशात गुलाम असून आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.
महाजागरण अभियानांतर्गत येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अॅड. उमेश सावंत, शबाना मुल्ला, राजरत्न आंबेडकर, मिशा मेश्राम, मामा माडये, एकनाथ तेली, प्रताप भोसले, नगरसेवक गौतम खुडकर, अनिल डेगवेकर, नंदू आरोलकर आदी उपस्थित होते.
१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेपासूनच निवडणुका या गडबड करून जिंकल्या गेल्या. नेहरूंनी विशिष्ट समुदायाचा जातीवाद गुप्तपणे राबवला. राज्यात ज्या जातीचे प्राबल्य त्यांना कॉँग्रेसने दिल्लीत आमचे सरकार आणा राज्यात तुमचे सरकार बनवू असे आमिष दाखवून जातीयवाद पोसला. या राजकारणातूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बनवून मराठावाद निर्माण केला. उमेदवारांना निवडणुकीसाठी मर्यादेपेक्षा जास्त पैसा पुरवण्याचे कॉँग्रेसनेचे सुरू केले. निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा याच पैशांच्या ताकदीने पराभव करण्यात आला. आजही कॉँग्रेस निवडणुकीसाठी शेकडो कोटी रूपये खर्च करते. त्यासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा उभा केला जात आहे.
पुढील काळात कॉँग्रेसने मतदान प्रक्रियेतच गौडबंगाल करण्यास सुरूवात केली. गुंडांच्या माध्यमातून बूथ कॅप्चरिंग करण्यासही सुरूवात केली. आणि याच गुंडांना पुढे तिकीटही देऊ केली. १९६७ च्या पुढील निवडणुकांमध्ये गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना पैसे देऊ करण्यात आले आणि त्यानंतर घरोघर पैसा वाटण्यात आला. पैसे वाटप करून निवडणुका जिंकण्याची कामे करण्यात आली, असे आरोप वामन मेश्राम यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त
केले. (प्रतिनिधी)