कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा
By Admin | Updated: April 19, 2016 00:35 IST2016-04-18T23:33:02+5:302016-04-19T00:35:28+5:30
भाजप-सेनेला भोवली सत्तेची लालसा : काँग्रेसला ९, शिवसेना ६, भाजप १, अपक्ष १

कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा
कुडाळ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवत कॉंगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेनेला सहा, भाजपसह अपक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. मतदारांनी काँग्रेस नेते,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी समोरासमोर उभी ठाकली होती. तर अपक्षांच्या सहभागानेही निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. चार फेरीत ही मतमोजणी होती. अवघ्या एका तासातच निकाल जाहीर झाला. पहिल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत सत्ता प्रस्थापित केली. शिवसेनेला सहा जागा मिळाल्या. तर सत्तेची स्वप्ने रंगवत राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपला मतदारांनी सपशेल नाकारले. केवळ एकाच जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला. तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. (प्रतिनिधी)
नारायण राणे, नीतेश राणेंचा करिष्मा
कुडाळ शहरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने कितपत मतदान होईल, याबाबत काही सांगता येत नव्हते. मात्र, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांचा करिष्मा या निवडणुकीत चालल्याने या ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व राहिले.
अनेक दिग्गज पराभूत
या निवडणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तत्कालीन सरपंच स्नेहल पडते, माजी सभापती शिल्पा घुर्ये, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे या व इतर अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले
राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप व सेना यांनी कुडाळ निवडणुकीत युती न करता स्वतंत्रपणे लढले. यावेळी दोन्ही पक्षांना सत्तेची लालसा भोवल्याची चर्चा मतमोजणी ठिकाणी सुरू होती. तर शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येही युती न केल्यानेच पराभव झाल्याचे बोलले जात होते.