पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा

By Admin | Updated: July 1, 2014 00:27 IST2014-07-01T00:22:34+5:302014-07-01T00:27:46+5:30

मालवणमध्ये स्नेहा आचरेकर, आंब्रडमध्ये कल्पिता मुंज विजयी

Congress flag in by-election | पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा

पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा

मालवण, कुडाळ : मालवण नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या स्नेहा आचरेकर यांनी, तर आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्याच कल्पिता मुंज यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी, शिवसेना-भाजप यांनी एकत्रित येत रचलेले विजयाचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये पसरलेले नैराश्य झटकण्यासाठी काँग्रेसच्यादृष्टीने हे दोन्ही विजय उभारी देणारे ठरणार आहेत.
मालवण नगरपरिषदेच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रभाग क्र. ३ क मधील नगरसेविका अपर्णा गावकर यांच्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने विद्यमान नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या पत्नी स्नेहा आचरेकर, तर शहर विकास आघाडीच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या मेघा गावकर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. नगरपालिकेत सद्य:स्थितीत मालवण शहर विकास आघाडीकडे आठ, तर काँग्रेसकडे आठ सदस्यांचे समसमान पाठबळ आहे. यामुळे पोटनिवडणुकीत नववा सदस्य प्राप्त करून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शहर विकास आघाडीने आणि काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
कुडाळ तालुक्यातील आंब्रड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत १ हजार १२२ मतांचे मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवार कल्पिता मुंज यांनी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुधा बांदेकर यांचा पराभव केला. काँग्रेसच्या या विजयामुळे तालुक्यातील काँगे्रस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आंब्रड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून कल्पिता आबा मुंज, तर राष्ट्रवादीकडून सुधा बांदेकर या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत कोण विजयी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Web Title: Congress flag in by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.