काँग्रेसकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By Admin | Updated: June 28, 2014 00:18 IST2014-06-28T00:14:17+5:302014-06-28T00:18:08+5:30
विनायक राऊत यांची टीका : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन

काँग्रेसकडून शेतकऱ्यांची फसवणूक
कुडाळ : चिपी विमानतळाच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांची काँग्र्रेस सरकार आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी फसवणूक केली आहे. यापुढे येथील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणाऱ्या या दलालांची आता गय केली जाणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या विनाकारण घेतलेल्या जमिनी त्यांना परत करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांंबरोबर लढा देणार आहे, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना परूळे येथील बैठकीदरम्यान दिले.
चिपी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी परूळे येथील श्री देव येसू आका मंदिरात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, कुडाळ तालुका संपर्कप्रमुख सुरेश पाटील, वेंगुर्ले तालुका संपर्कप्रमुख शैलेश परब उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या भूमी बचाव कृती समितीच्यावतीने अध्यक्ष चंद्रवर्धन आळवे व वासुदेव माधव यांनी खासदार राऊत यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.
शासनाने आतापर्यंत येथील शेतकऱ्यांची फसवणूक करून विमानतळासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात कवडीमोल किमतीने भूसंपादन केले. सुरुंग स्फोटांमुळे आमच्या घरांना भेगा पडल्या आहेत. याबाबत माहिती देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या सर्व समस्यांचा विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. सरपंच महेश सामंत यांनी येथील प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊन व्हावेत, अशी मागणी केली. तर सचिन देसाई यांनी काँग्रेस सरकार आणि लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे लक्षच दिले नाही, असे सांगितले.
यावेळी खासदार राऊत यांनी, येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार, विनाकारण संपादित केलेली जमीन परत करण्यासाठी प्रयत्न करणार, प्रकल्पग्रस्तांना विमानतळ प्रकल्पांतर्गत नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार, सुधारीत भूमी निकषाप्रमाणे पैसे देण्यास भाग पाडू, आयआरबीकडून काम काढून घेऊन एमआयडीसीकडे सोपविणार, रस्त्यांचे पुनर्रीक्षण करून योग्य रस्त्यांसाठी प्रयत्न करणार, प्रकल्पग्रस्तांना सर्व सोयीसुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार व यासंदर्भात लवकरच प्रकल्पग्रस्त आणि संंबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. राऊतांनी बैलगाडीतूनच फिरावे, या पालकमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना राऊत म्हणाले, आम्ही सर्वसामान्य माणसे बैलगाडीतूनच फिरणार. आम्हाला विमानाची अपेक्षा
नाही. (प्रतिनिधी)