वाढीव तुकड्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By Admin | Updated: July 5, 2015 01:17 IST2015-07-05T01:15:05+5:302015-07-05T01:17:30+5:30
रवींद्र वायकर : अकरावीच्या तुकड्या न वाढविण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप

वाढीव तुकड्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
रत्नागिरी : अकरावीच्या नवीन तुकड्या न वाढविण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते जिल्हा दौऱ्यावर आले असताना शहरातील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये सायन्स, कॉमर्समधील प्रवेशाचा प्रश्न निर्माण होतो. इच्छेनुसार प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीच्या तुकड्या वाढवून मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडे मागणी केली होती. मात्र, शासनाने अकरावीच्या नवीन तुकड्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार शिक्षण मिळालेच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाने नवीन तुकड्यांना मान्यता न देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून, त्याला आपला कायम विरोध राहणार आहे. त्यासाठी नवीन तुकड्यांना परवानगी मिळावी म्हणून आपण मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या शिक्षक, चतुर्थश्रेणी व इतर कर्मचाऱ्यांच्या भरती होत नसल्याने त्याचा
परिणाम शासकीय कामावर होत आहे. आपण ही नोकरी भरती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असल्याचे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये यांची अवस्था फार बिकट आहे. त्यामध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग नाहीत. याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून ही भरती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर भरती होण्यास पुढे येत नसल्याने तेथे मेडिकल कॉलेजची निर्मिती करणे आवश्यक आहे. आज खेड्यांमध्ये डॉक्टर जायला मागत नाहीत. शहराकडे त्यांचा ओढा जास्त आहे. कारण डॉक्टरी हा धंदा झालाय, पूर्वी डॉक्टरी सेवा होती, असे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘त्या’ रुग्णालयावर कारवाई
पालकमंत्र्यांनी एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण पाठविला होता. तो बरा झाल्यानंतर त्याला बिल अदा केल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संपर्क साधला असता रुग्णालयाकडून ५० हजार रुपये बिल झाल्याचे सांगण्यात आले.
काही वेळाने त्यामध्ये वाढ करून ते बिल ६७ हजार रुपये सांगण्यात आले. तेही आपण भरले असून, त्याची पावतीही त्या रुग्णालयाने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
राज ठाकरेंना टोला
पालकमंत्र्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना शिवसेना सुपाऱ्या घेत नाही, तर थेट अॅक्शन घेते, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेना इतर प्रकल्पांकडून सुपाऱ्या घेऊन अणुऊर्जेला विरोध करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. आपण जैतापूर प्रकल्पाला लवकरच भेट देणार असल्याचे सांगून शिवसेना नेहमीच जनतेच्या बाजूने उभी राहिली आहे आणि पुढेही राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.