मत्स्यविक्रेत्यांना समस्यांचा विळखा
By Admin | Updated: November 2, 2014 23:30 IST2014-11-02T21:28:15+5:302014-11-02T23:30:26+5:30
वेंगुर्लेतील स्थिती : सुविधांची वानवा

मत्स्यविक्रेत्यांना समस्यांचा विळखा
प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -येथील मच्छिमार्केट संबंधात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये असणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधांबाबत मच्छिविक्रेत्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रोजची रोजीरोटी भागविण्यासाठी मत्स्यविक्रेते संकटाशी सामना करीत असल्याचे दिसून येत आहे.
अथांग समुद्र किनारा लाभलेल्या वेंगुर्ले शहरात नगरपरिषदेच्या शेजारीच मत्स्यविक्रीचा बाजार भरविला जातो. वायंगणी, उभादांडा, मूठ, बागायत, दाभोसवाडा येथील महिला मासे आणून या बाजारपेठेत विक्री करतात. परंतु या मत्स्यविक्रेत्या महिलांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा नसल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या मार्केटमध्ये दररोज ६० ते ७० महिला मत्स्यविक्री करतात. परंतु मच्छिमार्केटची जागा अपुरी पडत आहे. त्यातच विक्रीसाठीचे कट्टे उपलब्ध नाहीत. महिलांसाठी स्वतंत्र संडास, बाथरूमची सोय नाही. जेवणासाठीची खोली, पाणी अशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. तसेच महत्त्वाची समस्या म्हणजे मत्स्य वाहतुकीचे वाहन थेट बाजारपेठेत जात नसून रस्त्यावरच गाडी थांबवून मासे बाजारात आणावे लागत आहेत. त्यातच बाजारात ‘नो पार्किंग’ असल्याने याचाही फटका मत्स्यविक्रेत्यांना बसत आहे.
दरम्यान, या समस्यांबाबत जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष स्रेहा केळकर व उपाध्यक्षा श्वेता हुले यांच्या नेतृत्वाखाली २० फेब्रुवारी २०१४ रोजी मत्स्य विक्रेत्या महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले होते.
या मोर्चात सुमारे ५०० ते ७०० महिला सहभागी झाल्या होत्या. परंतु या मोर्चाबाबत कोणताही न्याय न मिळाल्याने समस्या तशाच राहिल्याचे श्वेता हुले यांनी सांगितले.
सद्यस्थितीत मच्छिमार्केटमधील सांडपाणी, मत्स्य विक्रीनंतरचा टाकाऊ माल यांच्या दुर्गंधीमुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मासे विकल्यानंतरचा टाकाऊ माल टाकण्यासाठी दूर जावे लागत आहे. याठिकाणच्या पायऱ्यांची उंची प्रमाणाबाहेर असल्याने वयोवृध्दांची दमछाक होते.
टाकाऊ माल टाकण्यासाठी मच्छिमार्केटमध्ये तशा स्वरुपाची सोय व्हावी, अशी मागणी मत्स्य विक्रेत्या महिलांमधून होत आहे.
एकूणच येथील मत्स्यविक्रेत्या महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोर्चा काढून आणि निवेदने देऊनही प्रशासन याची दखल घेत नसल्याने या समस्या तीव्र होत आहेत. तातडीने या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी मत्स्य विक्रेत्या महिलांमधून होत आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे
सध्या मच्छीमार्केटमधील जागाही अपुरी पडत आहे. नगरपरिषदेने त्यामध्ये सुधारणा करावी किंवा सर्व सुविधांनी युक्त अशी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून वाहतूक, पाणी, प्रसाधनगृह व अन्य समस्या सुटून मत्स्यविक्री सुलभ होईल.
- श्वेता हुले, उपाध्यक्षा,
महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था, वेंगुर्ले