प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल
By Admin | Updated: July 2, 2015 00:29 IST2015-07-01T22:41:00+5:302015-07-02T00:29:30+5:30
रामपूर आरोग्य केंद्र : तीस ते चाळीस गावातील रुग्णांना फटका

प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल
चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाची (लॅब टेक्निशियन) बदली संगमेश्वर तालुक्यात वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. एक महिना ही जागा रिक्त असल्याने ३० ते ४० गावातील रुग्णांचे हाल होत आहेत.
रामपूर आरोग्य केंद्रात आतापर्यंत २५ हजार ६०० बाह्य रूग्णांची तपासणी झाली आहे. सर्पदंशामधील रक्तचाचणी बी. टी. सी. टी. १०० रुग्ण, गरोदर महिला एच. बी. युरिन, एच. आय. व्ही. २५० रुग्ण तपासणी, एड्स, गरोदर महिला, इतर रुग्ण २५०, मलेरिया तपासणी, तापाच्या रुग्णांची तपासणी ३००० रुग्ण, लेप्टो तपासणी तापाच्या रुग्णांची रक्त चाचणी १५, सर्व गरोदर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, ८००० लघवी तपासणी, डायबेटीस रुग्ण २०००, रक्तातील साखर तपासणी ५०० रुग्ण, टायफाईड तपासणी तापाच्या रुग्णांची रक्त तपासणी २५०, डेंग्यू ताप रक्त चाचणी ५, इतर वर्षाच्या सरासरी तपासण्या ८९६ झाल्या आहेत.
या ठिकाणी येणारे रुग्ण पाहता लॅब टेक्निशियनचे याठिकाणी सतत काम आहे. त्यामुळे हे पद रिक्त असल्याची जास्त गैरसोय जाणवत आहे. एक महिना रिक्त झालेल्या जागेवर अन्य लॅब टेक्निशियन नियुक्ती केली नसल्याने रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ३० ते ४० गावातील हजारो डायबेटिस व इतर रुग्णांची तपासणी होत नसल्याने हाल होत आहे. ही बाब रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्य शासनाने आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन जागा तातडीने भरावी व रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा महाराष्ट्र राज्यात आदर्श आरोग्य केंद्र म्हणून पहिला नंबर आला आहे. (प्रतिनिधी)