काँग्रेस, शिवसेना-भाजपचे संमिश्र यश
By Admin | Updated: April 24, 2015 01:31 IST2015-04-24T01:30:15+5:302015-04-24T01:31:22+5:30
ग्रामपंचायत निकाल जाहीर : काँग्रेस २७, शिवसेना १७, भाजप १२, ग्रामविकास आघाडी १0

काँग्रेस, शिवसेना-भाजपचे संमिश्र यश
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीत काँग्रेसने २७, शिवसेनेने १७, भारतीय जनता पक्षाने १२ तर ग्रामविकास आघाडीने १0 जागा जिंकल्या. ६६ सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणी झाली.
या निवडणुकांसाठी एकूण ९४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत ९५,१५८ तर पोटनिवडणुकांसाठी ३0२१ असे एकूण ९८,१७९ मतदारांपैकी ६६,९८२ मतदारांनी हक्क बजावला होता.
देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोर्ले, वरेरी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उर्वरीत २१ ग्रामपंचायतींचा जाहीर झालेल्या निकालामध्ये ९ ग्रामपंचायती भाजपाकडे व ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तसेच ३ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणत्याही ग्रामपंचायतीवर स्वतंत्र अस्तित्व राखले नाही. कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर आणि तोंडवली- बावशी या तीन ग्रामपंचायतीमध्ये भिरवंडे आणि तोंडवली- बावशी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळविला तर गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली. मालवण तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच ठिकाणी आपले गड शाबूत ठेवले असतानाच चिंदर आणि मसदे या दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडून हिसकावून घेत शिवसेनेने आपला भगवा फडकविला आहे. या निवडणुकीत भाजपचा चंचूप्रवेश झाला असून काँग्रेसने जिंकलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मसुरे- डांगमोडे, कुणकावळे, गोळवण, कुमामे, आडवली, मालडी, पेंडूर- खरारे यांचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यातील ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे तर सोनाळी आणि आचिर्णे ग्रामपंचायतीवरील सत्ता काँग्रेसने कायम राखली आहे. वेंगसर, मांगवली आणि एडगाव या तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. दरम्यान, ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवत जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसने चार ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला.
या निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच धक्का मिळाला आहे. मतमोजणीनंतर सर्वत्र विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेंगुर्ले तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतींच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत आरवली ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत आरवली विकास पॅनेलने सत्ता प्रस्थापित केली. तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीने आठ जागा जिंकल्या असून शिवसेनेने फक्त एकच जागा जिंकली आहे. दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँगे्रसने कुडासे गावात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर तेरवण मेढे येथे ग्रामविकास पॅनेलने बाजी मारले. कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकावला. काँगे्रसला तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, भाजपा तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांचे पानिपत झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला आहे. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)