जनतेच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करणार
By Admin | Updated: May 3, 2017 23:32 IST2017-05-03T23:32:27+5:302017-05-03T23:32:27+5:30
सुमित्रा महाजन : विकासकामासाठी मंत्री सक्षम आहेत; सीव्हीसीए कायद्यातून सवलत मिळावी; निवेदनातून मागणी

जनतेच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करणार
मालवण : कोकणसह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, केंद्रीय मंत्री यांचे केंद्रशासनात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा वापर निश्चितच कोकणसह महाराष्ट्राच्या विकासात होणार आहे. विकास प्रक्रियेत जनतेला महत्त्वाचे स्थान आहे. आपण कधीच आश्वासने देत नाहीत. विकासकामासाठी मंत्री सक्षम असून कोकणातील जनतेच्या हिताचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर असलेल्या सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सकाळी मालवण शहरातील मेढा जय गणेश मंदिर येथील सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ अधिकारी व त्यांचे नातेवाईक तसेच महसूल, पोलीस व अन्य प्रशासकीय यंत्रणा अधिकारी उपस्थित होते. यावेळी जयेंद्र साळगावकर व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी महाजन यांचे स्वागत केले.
सहा वर्षांपूर्वी जोतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्यासोबत मंदिराला भेट दिली होती. साळगावकर घराण्याशी आपले आपुलकीचे नाते आहे. जोतिर्भास्कर यांनी त्यावेळी ‘देशात एकहाती सत्ता येऊ देत’ असे गणेशाच्या चरणी मागणे मागितले होते. आज केंद्रात सत्ता आल्याने आपले श्रद्धास्थान असलेल्या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी आपण जोतिर्भास्कर यांचा पुत्र जयेंद्र यांना पूर्वसूचना देत मालवणला आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
कोकणचे ‘कोकण’पण टिकावे
लांबसडक किनारे, हिरवीगार वनराई ही कोकणची ओळख आहे. कोकणचे हे अनोखे कोकणपण टिकून राहिले पाहिजे. झाडे तोडून डोंगर बोडके करुन चालणार नाही. डोंगरावर बंधारे घालून पाणी अडवले पाहिजे. झाडे जगविली पाहिजेत तसेच किनारपट्टी स्वच्छ ठेवत स्वच्छ किनारे ही कोकणची शान बनली पाहिजे, असे महाजन म्हणाल्या .
केंद्रशासनाचा सागरी किनारपट्टीवर ५०० मीटर क्षेत्रात सीआरझेड कायदा लागू आहे. या कायद्यात अगदी किनाऱ्यावरील क्षेत्र सीव्हीसीए म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात बांधकाम परवानगी मंत्रालय स्तरावर मिळते. त्यामुळे या जाचक सीव्हीसीए कायद्यातून मालवण शहरास सवलत मिळावी या मागणीचे निवेदन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिले. यावेळी नगरसेवक गणेश कुशे, आपा लुडबे, नितीन वाळके, पूजा सरकारे उपस्थित होते.