नीतेश राणेंचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण

By Admin | Updated: September 30, 2014 00:23 IST2014-09-30T00:20:35+5:302014-09-30T00:23:35+5:30

कणकवली मतदारसंघ : काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Complete the first stage of Nitesh Rane's campaign | नीतेश राणेंचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण

नीतेश राणेंचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण

कणकवली : निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी त्याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच गेले पंधरा दिवस संभाव्य उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यात काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदार संघातील उमेदवार नीतेश राणे यांचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता त्यांना या मतदारसंघात अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्याने मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आता पंधरा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांना फार कमी कालावधी मिळणार आहे. त्यातच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली नाही. त्यामुळे सर्वच संभाव्य उमेदवारांची तारांबळ उडाली होती. आता मात्र, प्रत्येक मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असल्याने खऱ्या अर्थाने त्याचवेळी लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कणकवली मतदारसंघात काँग्रेसतर्फे नीतेश राणे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ होती. मात्र, नीतेश राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. नीतेश राणे यांनी प्रचाराचा पहिला आणि भेटी-गाठींचा टप्पा पूर्ण केला असून १ आॅक्टोबरनंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. कणकवलीसह देवगड आणि वैभववाडी तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते प्रचार जोमाने राबविणार असून या टप्प्यात छोट्या-मोठ्या प्रचार बैठका आणि विभागीय मेळावे घेण्यात येणार असल्याचे नीतेश राणे यांनी बोलताना स्पष्ट केले. विद्यमान आमदारांमुळे या मतदारसंघात ठप्प असलेली विकासकामे हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचेही नीतेश राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मतदारसंघात प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आपण यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. येथील समस्या जाणून घेवून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येणार आहे. आपल्याला पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.- नीतेश राणे, काँग्रेस प्रांतिक सदस्य

Web Title: Complete the first stage of Nitesh Rane's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.