ग्रामसेवकांच्या तक्रारींचा पाढा
By Admin | Updated: July 15, 2015 21:26 IST2015-07-15T21:26:20+5:302015-07-15T21:26:20+5:30
देवगड पंचायत समिती सभा : चौकशी करून दोषींवर कारवाईचे सभापतींचे आदेश

ग्रामसेवकांच्या तक्रारींचा पाढा
देवगड : देवगड पंचायत समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारीचा पाढा वाचला. मणचे येथील ग्रामसेवक दोन दिवस ग्रामपंचायतीमध्ये नसल्याचे सदस्या दिप्ती घाडी यांनी सांगितले. ग्रामपंचायत विभागाकडेही ग्रामसेवकाच्या रजेचा अर्ज नसल्याचे विस्तार अधिकारी यांनी सभागृहात सांगताच सभापती डॉ. मनोज सारंग यांनी त्या ग्रामसेवकाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा किसान भवन सभागृहात सभापती डॉ. मनोज सारंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण उपस्थित होते.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहतात की नाही, असा ग्रामसभेचा ठराव घ्यावा, असे रवींद्र जोगल यांनी सांगितले. अंडरग्राऊंड विद्युतवाहिनी जोडणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उत्खननाची परवानगी अद्यापपर्यंत न मिळाल्यामुळे पूर्ण झाले नाही. अंडरग्राऊंड विद्युतवाहिनी जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होईल, असे उत्तर वीज वितरण विभागाकडून देण्यात आले. पंचायत समितीमधील कामचुकार व कार्यालयीन वेळेत हजर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र जोगल यांनी केली. हर्षा ठाकूर यांनी जामसंडे गावातील बंद स्ट्रीटलाईट व मेडिक्लोअर वाटप हे विषय उपस्थित केले. देवगड जामसंडेमधील २१ अनधिकृत नळधारकांची माहिती मागितली. मात्र, माहिती लपविल्याचा आरोप रवींद्र जोगल यांनी करून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (प्रतिनिधी)
गणेश चतुर्थीपूवी खड्डे बुजवा
मळेगाव-अनभवणेवाडी अंगणवाडीच्या ‘टीएचआर’मध्ये अळ्या आढळल्याचे सदस्या दिप्ती घाडी यांनी बैठकीत सांगितले. सभापती डॉ. मनोज सारंग यांनी चौकशी करण्याचे आदेश पंचायत समितीच्या बैठकीत दिले. गणेश चतुर्थीपूर्वी देवगड तालुक्यातील रस्त्यांमधील खड्डे बुजवावेत, अशी मागणी दिप्ती घाडी यांनी केली. पडेल-तिर्लोट रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत प्रकाश गुरव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आठ दिवसांनी आढावा घ्यावा, अशी मागणी रवींद्र जोगल यांनी केली.