मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

By Admin | Updated: April 15, 2016 00:41 IST2016-04-14T23:12:16+5:302016-04-15T00:41:31+5:30

राजन तेली : जिल्ह्यात विहिरी, साकवांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Complain to the Chief Minister | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

कणकवली : सिंधुदुर्गात विहिरी आणि साकवांच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. त्याचबरोबर रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत भाजपाच्यावतीने तक्रार करण्यात येईल. निकृष्ट कामे करणारे ठेकेदार आणि त्यांची पाठराखण करणारे अधिकारी यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी यासाठी आमचे प्रयत्न रहाणार असल्याचे भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी येथे सांगितले.
येथील भाजपा संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर काँग्रेसचे कार्यकर्तेच सर्वाधिक ठेकेदार आहेत. त्यामुळे अल्पावधीत प्रचंड पैसा मिळविण्यासाठी काँग्रेसची ठेकेदार मंडळी सातत्याने निकृष्ट कामे करीत आहेत. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांनाच सातत्याने कामे का दिली जातात असा प्रश्न अलीकडेच झालेल्या एका सभेत जिल्हा परिषदेच्या सभापतींनीच विचारला होता. त्यामुळे यातून किती भ्रष्ट कारभार सुरू आहे हे दिसून येते. सावंतवाडी तालुक्यातील एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बागेत शासकीय खर्चाने साकव बांधण्यात आला आहे.
ठेकेदारांनी सचोटीने व्यवसाय करायला आमची काहीच हरकत नाही. पण कुठला पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेला बांधिल राहून कामे करायला हवीत. रस्त्यांच्या कामांसाठी गेल्या अनेक वर्षात निधी आला नव्हता. पण आता आलेला निधीतून निकृष्ट कामे होत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. गेल्या काही महिन्यात झालेली निकृष्ट कामे आणि त्यांना जबाबदार असणारे अधिकारी यांचेवर कारवाई व्हायलाच हवी अशी आग्रही मागणी संबंधित खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांचेकडे आम्ही करणार आहोत.
कुडाळ शहराच्या नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असाही विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. सर्व ग्रामपंचायतींना ८० लाख तर नगरपंचायती, नगरपरिषदांना २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा शासनाने केली आहे. राज्यात नगरविकास खाते भाजपकडे आहे. कुडाळच्या विकासासाठी जनतेने भाजपलाच मतदान करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कणकवलीत मागील सतरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या कालावधीत त्यांना ५८ पैकी केवळ एकच आरक्षण विकसित करता आले. तशी परिस्थिती आम्ही कुडाळमध्ये होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)

शासकीय निधी : खासगी विहिरींची दुरूस्ती
कणकवली तालुक्यातील नागवे-सागवेकरवाडी येथील सरकारी विहीर दुरुस्तीच्या नावाखाली चक्क खासगी विहिरीची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी साडे तीन लाख रुपयांचा खर्च देखील करण्यात आलाय. याबाबत तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. पण विहिरीचा मालक काँग्रेसचा पदाधिकारी आणि जिल्हा परिषदही काँग्रेसच्याच ताब्यात असल्याने कारवाई होत नसल्याचे तेली यांनी यावेळी सांगितले.

निकृष्ट कामांच्या तक्रारी करा
ज्या गावात रस्ते व इतर कामे निकृष्ट होतील, त्याबाबतच्या तक्रारी संबंधित खाते आणि भाजप कार्यालयात करण्यात याव्यात. तसेच गावागावातील कामे दर्जेदार होण्यासाठी आता ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यायला हवा. ज्या गावातील कामे निकृष्ट असतील त्यांनी याबाबत तक्रारी कराव्यात, असे आवाहन राजन तेली यांनी केले.

Web Title: Complain to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.