नुकसान भरपाईचे साकड
By Admin | Updated: November 12, 2014 23:58 IST2014-11-12T20:53:24+5:302014-11-12T23:58:13+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची भेट : जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवेदने

नुकसान भरपाईचे साकड
ओरोस : जिल्ह्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रति हेक्टरी ३५ हजार रुपये विनाअट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती हे मुख्य पीक असल्याने शेती पिकावरच शेतकरी आपली गुजराण करीत असतो. परंतु अगदी भातपीक कापणीच्यावेळी अवकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविण्यासाठी पंचनामे न करता प्रति हेक्टरी ३५ हजार रुपये विनाअट नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव सादर करावा. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाठपुरावा करा
जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन बंदी असल्यामुळे कुठलेही बांधकाम अगर शासकीय कामे करताना लागणारे चिरे, वाळू जिल्ह्यात मिळणे कठीण झाले आहे. या सर्व बांधकामांना लागणारे साहित्य इतर जिल्ह्यातून मागविल्यास त्याचा खर्च मोठा असून तो सर्वसामान्य माणसाला परवडणार नाही. त्याप्रमाणे वेळेवर शासकीय कामे पूर्ण न होऊन निधीचा वापर झाल्यास निधीही परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले दोन ते तीन वर्षे या जिल्ह्यातील लोकांचे फारच हाल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करावा अशीही मागणी करण्यात आली.