लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती
By Admin | Updated: April 10, 2015 00:25 IST2015-04-09T22:38:56+5:302015-04-10T00:25:50+5:30
संतोष भोसलेंची माहिती : वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची अध्यक्षपदी निवड करणार

लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती
सिंधुदुर्गनगरी : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण व्हावे तसेच याबाबतच्या तक्रारीचे निवारण व्हावे याकरिता १० किंवा १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, अशासकीय संस्था, उद्योग, असंघटित क्षेत्रातील कामगार व कायद्यात नमूद इतर सर्व आस्थापनांवर अंतर्गत तक्रार समितीचे गठन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार या समितीवर संबंधित कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकातून
दिली.
तथापि, वरिष्ठ महिला अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसेल तर इतर कार्यालये, प्रशासकीय विभाग जी विविध ठिकाणी म्हणजे विभाग किंवा उपविभाग स्तरावर कार्यरत आहेत अशा कार्यालयातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी.
तसेच कामाच्या ठिकाणी असणाऱ्या इतर कार्यालयात किंवा प्रशासकीय विभागातही वरिष्ठ स्तरावरील महिला अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नसेल तर त्याच नियुक्तींच्या अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणाहून किंवा इतर विभागातून किंवा खासगी क्षेत्रात इतर संघटनेतील अध्यक्ष पदस्थ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या समितीमध्ये प्राधान्याने महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान सदस्य नियुक्त करावेत. तसेच महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती, यामधील एक सदस्य असावा. तथापि, अशारितीने नामनिर्देश करावयाच्या एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य या महिला असाव्यात. याशिवाय अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष आणि प्रत्येक सदस्य यांची कार्यालय प्रमुखाकडून नियुक्ती करण्यात येईल व त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी ते पद धारण करता येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)