दोडामार्ग विकासासाठी कटिबद्ध

By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:56:48+5:302015-10-29T00:08:11+5:30

दीपक केसरकर : युतीच्या प्रभागवार कॉर्नर सभा

Committed to development of Dodamag | दोडामार्ग विकासासाठी कटिबद्ध

दोडामार्ग विकासासाठी कटिबद्ध

कसई-दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची माझी जबाबदारी आहे. दोडामार्गात विविध प्रकल्प एमआयडीसीच्या माध्यमातून आणून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी तालुक्यातील जनतेने एकसंघ राहिले तरच तालुक्याचा विकास होईल. यासाठी दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता युतीच्या हातात द्या. कसई-दोडामार्ग ही आदर्श नगरपंचायत बनविली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
कसई- दोडामार्ग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागवार कॉर्नर सभा घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. पहिली कॉर्नर सभा प्रभाग क्र. १ मध्ये सावंतवाडा येथे घेण्यात आली. यावेळी केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, चंद्रशेखर देसाई, पांडुरंग नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

माटणेत दुसरी एमआयडीसी होणार
केसरकर म्हणाले की, शहराचा विकास घडविण्यासाठीचे नियोजन हे निवडून आलेल्या नगरसेवकांकडे असते. विकास करावयाचा असेल तर निधी आवश्यक असतो. लोकांच्या एकीमुळे सावंतवाडी शहराचा विकास झालेला आहे. तसाच विकास दोडामार्ग शहराचा नगरपंचायतीच्या माध्यमातून केला जाईल, निधी कमी पडू देणार नाही. आडाळीत एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे, तर माटणे येथे दुसरी एमआयडीसी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारी नष्ट होणार आहे. यावेळी केसरकर यांनी विविध प्रभागांत कॉर्नर सभा घेऊन युतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

Web Title: Committed to development of Dodamag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.