जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: July 9, 2015 00:14 IST2015-07-09T00:14:42+5:302015-07-09T00:14:42+5:30
भाजप पदाधिकारी आक्रमक : विकासकामे मंजूर होत नसल्याचा आरोप

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना घेराव
सिंधुदुर्गनगरी : भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून सुचविलेली विकासकामे पाठपुरावा करूनही मंजूर होत नाहीत. मात्र, इतर पक्षाकडून दूरध्वनीवरून सांगितलेली विकासकामे मंजूर केली जातात. त्यामुळे अखेर बुधवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना घेराव घालत याबाबतचा जाब विचारला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता या प्रकरणी आपण बारकाईने लक्ष देऊन पुरवणी यादी ठेवून विकासकामे मंजुरीसाठी ठेवतो असे सांगत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शांत केले.
जिल्हा नियोजनमधून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विकासात्मक कामे केली जातात. परंतु जिल्हा नियोजन विकास आराखड्यामध्ये भाजपचे प्रमोद जठार, अतुल काळसेकर, काका कुडाळकर आदी पदाधिकाऱ्यांनी काही विकासकामे सुचविली होती. मात्र दूरध्वनीवरून संपर्क करून सुचविलेली काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे विकासकामांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही कामे ठेकेदारांशी बसून निश्चित करण्यात आली आहेत असा आरोप भाजपच्या काका कुडाळकर व अतुल काळसेकर यांनी केला आहे.
याबाबत बुधवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालत आमची कामे सुचवूनही का डावलण्यात आली याची कारणे द्या. कोणाच्या सांगण्यावरून कामे डावलली? आमचा हक्क का डावलला जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना धारेवर धरले. यावेळी नियोजन अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.
पुरवणी यादीद्वारे विकासकामे मंजुरीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे जाणूनबुजून डावलण्यात आली आहेत. आमची कामे यादीत समाविष्ट केली नाहीत. अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. कामे का डावलली याचे नियमानुसार उत्तर द्या. तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आपण याबाबत स्वत: लक्ष घालून कोणावर अन्याय होऊ नये यासाठी आपली कामे मंजूर होण्याच्या दृष्टीने पुरवणी यादी नियोजन समिती सादर केली जाईल असे स्पष्ट करत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शांत केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काका कुडाळकर, प्रज्ञा ढवण, प्रमोद रावराणे, बाळू देसाई, राजू राऊळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचाराची चौकशी करा
जिल्हा नियोजनमधून दीड वर्षापूर्वी घेतलेली कामे पूर्ण झालेली असताना संबंधित कामांना पुन्हा निधी देऊन भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याची चौकशी करण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे