विठ्ठलादेवीमध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ अभियान
By Admin | Updated: November 19, 2014 23:23 IST2014-11-19T23:02:57+5:302014-11-19T23:23:24+5:30
गावाच्या स्वच्छतेने परिसर झळाळला : फणसगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

विठ्ठलादेवीमध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ अभियान
फणसगांव : देवगड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगांवच्यावतीने विठ्ठलादेवी गावामध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ हे अभियान राबविले जात आहे. यामध्ये फणसगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन गावातील सार्वजनिक व धार्मिक ठिकाणांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. या स्वच्छता अभियानामुळे गावातील परिसर झळाळून निघाल्याने या अभियानाचे कौतुक होत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला आणि देशभरात स्वच्छतेची मोहीम सुरु झाली. या अभियानाला संपूर्ण भारतभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच विचारांचे अनुकरण करत ग्लोबल फाऊंडेशन कुडाळ या संस्थेच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात ‘स्वच्छ वाडी, सुंदर गाव’ हे अभियान राबविले जात असून ‘शांतीमय जीवनाकरीता शिक्षण’ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३० विद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये फणसगांव हायस्कूलचाही सहभाग आहे. हे अभियान यशस्वीरित्या राबविणाऱ्या विद्यालयांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
फणसगांव हायस्कूलमध्ये या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एम. आर. जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक नारकर, सरपंच ज्योती नारकर, उपसरपंच प्रशांत जठार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विश्राम नारकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण कार्लेकर, सदानंद नारकर, ग्रामपंचायत सदस्या शितल कार्लेकर, जयश्री नारकर उपस्थित होते.
अभियानाच्या पहिल्या दिवशी शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गटागटाने गावातील रस्ते, पायवाटा, पाणवठ्याची ठिकाणे, मंदिरे, शाळा, सरकारी हॉस्पिटल, बस थांबा परिसर स्वच्छता करण्यात आली. अभियानामध्ये ग्रामस्थांना सहभागी करत अभियान यशस्वीरित्या राबविले जाईल. या अभियानाची सर्वत्र जनजागृती केली जाईल. तसेच हे अभियान राबविताना बक्षीस मिळविणे हा हेतू नसून यापुढेही दर शनिवारी किंवा रविवारी प्रत्येक वाडीमध्ये स्वच्छता अभियान निरंतर चालू ठेवून आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावांची स्वच्छता करणार असल्याचे प्राचार्य एम. आर. जाधव यांनी यावेळी बोलताना
सांगितले. (वार्ताहर)