क्लीनचीट हा विधानसभेचा हक्कभंग
By Admin | Updated: October 27, 2015 23:59 IST2015-10-27T23:36:53+5:302015-10-27T23:59:17+5:30
यशवंत बाईत : अंजनवेल ग्रामपंचायतीत रंगला कलगीतुरा

क्लीनचीट हा विधानसभेचा हक्कभंग
गुहागर : विधानसभेत तारांकित प्रश्न केल्यानंतर १ जुलै २०१० रोजी तत्कालीन विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमधील अनेक त्रुटींचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रत्नागिरी गॅस व पॉवर कंपनीकडून करापोटी मिळणाऱ्या कोट्यवधी रक्कमेची कामे करताना अंजनवेल ग्रामपंचायतीकडून दुरुपयोग झालेला नाही अशी क्लिनचीट दिली आहे. ही विधानसभेची फसवणूक असून, दोषींवर तत्काळ हक्कभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी केली आहे.सरपंच बाईत यांनी सांगितले की, मे २०१०मध्ये पालकमंत्री भास्कर जाधव यांच्याकडे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सत्तार कोंडेकर यांनी तक्रार केल्यानंतर काही आमदारांनी रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडून मिळणाऱ्या कोट्यावधी कररुपी निधीचा दुरुपयोग होत असल्याचा प्रश्न तारांकित केला. यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणीनंतरचा अहवाल व यानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेली क्लिनचिट लक्षात घेता विधानसभेची प्रशासनाने फसवणूक केली आहे.
एकाचवेळी एकच अधिकारी एकाच तारखेला दोन अहवाल करु शकतो काय? यानंतर दोषी ग्रामसेवकांना व सरपंचांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस गटविकास अधिकारी यांनी दिली. दोषी सापडले होते मग दोन वर्षे हे प्रकरण तसेच का ठेवले. यावर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही? यानंतर मार्च २०११ मध्ये पुन्हा मशिदीजवळील संरक्षक भिंत बांधणे २ लाख २७ हजार व कातळवाडी रस्ता करणे २ लाख ४५ हजार या कामात भ्रष्टाचार झाल्याचे पुढे येऊन २०१५ला सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल झाला.
याबाबत भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल असताना आधीच ग्रामसेवकावर कारवाई झाली असती तर पुढील भ्रष्टाचार झाले नसते. या भ्रष्टाचारामागे व हे प्रकरण प्रलंबीत ठेवण्यामागे प्रशासनाचाही हात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे फौजदारी दाखल करण्याचे आदेश असताना दोन वर्षे ही कारवाई का झाली नाही. आता मात्र आठ दिवसात कारवाई झाली. पंचायत समितीमध्ये पक्षीय राजकारण खेळले जात आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे. २२ एप्रिल २०११पासून मी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला असताना या आधी झालेल्या कामांची वसुली केली जात आहे. मला नाहक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोषी असेन तर नक्की कारवाई करावी. पण व्यावहारिक पद्धतीने व्हावी. माझ्या कारकिर्दीमधील कोणत्याही कामाच्या चौकशीला मी तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.