सर्वसामान्यांना हक्क द्या

By Admin | Updated: February 28, 2015 23:29 IST2015-02-28T23:24:28+5:302015-02-28T23:29:48+5:30

अनिल जोशी : दोडामार्ग येथे न्यायालयाचा शुभारंभ

Claim the common people | सर्वसामान्यांना हक्क द्या

सर्वसामान्यांना हक्क द्या

कसई दोडामार्ग : या न्यायालयातून सर्वसामान्यांचा हक्क मिळाला पाहिजे. या इमारतीचे ज्ञानमंदिरात रुपांतर करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल रा. जोशी यांनी दोडामार्ग येथे नूतन न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
दोडामार्ग येथील नूतन दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्यायदंडाधिकारी प्र. वर्ग न्यायालयाचे व नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोशी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल, जिल्हा संघटना अध्यक्ष अ‍ॅड. शाम सावंत, नूतन न्यायालयाचे न्यायाधीश ओमप्रकाश माळी, सभापती महेश गवस, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सरपंच संतोष नानचे, गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, उपअभियंता पी. जी. पाटील, तहसीलदार संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायमूर्ती जोशी म्हणाले, वकील हा न्यायालयाचा एक अविभाज्य घटक आहे. वकिलांनी पहिली बाजू आपल्या पक्षकाराची मांडावी, हे बरोबर आहे. परंतु न्यायदानाला कसे सहकार्य होईल, ही जबाबदारीही वकिलाची असते. निरपेक्ष विवेकबुध्दीने न्यायदानाचे कार्य करणे ही आमची व सर्व न्यायाधीश वर्गाची जबाबदारी आहे. या दोन प्रमुख वर्गांनी आपापली जबाबदारी पार पाडली, तर सर्वांना न्याय मिळेल, अशी खात्री वाटते.
वकिलांनीसुद्धा पक्षकारांचा कोणत्या केसेस घ्याव्यात आणि कोणत्या फेटाळाव्यात, याबाबत वकिलांनी धाडस करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात न्यायालय हवे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टींबरोबरच माणसाला न्यायहक्क मिळणे आवश्यक आहे. न्यायहक्काची जाणीव ज्या समाजामध्ये आहे, तो समाज पुढे काही तरी चांगले घडवू शकतो. निकाल हा कमी वेळेत, कमी खर्चात सर्वांना मिळावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे जबाबदारपणे न्यायदानाचे काम करत रहा, असे जोशी यांनी सांगितले.
या नूतन इमारतीचे काम सरकारी यंत्रणेने वेळेत केले. याबाबत कार्यकारी अभियंता एस. बी. सिद्धे यांचा शाल, श्रीफळ देऊन जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, ठेकेदार अरविंद देशपांडे, यशवंत आठल्येकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. डब्ल्यू. गोडकर, सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Claim the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.