वेंगुर्लेचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार
By Admin | Updated: May 11, 2016 00:09 IST2016-05-10T22:04:49+5:302016-05-11T00:09:53+5:30
येत्या डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २१५ नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यात वेंगुर्ले नगरपरिषदेचाही समावेश आहे.

वेंगुर्लेचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार
वेंगुर्ले : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी दोन वॉर्डांचा एक प्रभाग असून नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष निवडणूक २00१ नंतर २0१६ मध्ये जाहीर झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. तर ९ प्रभागांमध्ये १७ वॉर्ड विभागले जाण्याची शक्यता आहे.येत्या डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २१५ नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यात वेंगुर्ले नगरपरिषदेचाही समावेश आहे. या निवडणूकीत वॉर्डांची रचना बदलली असून दोन वॉडार्चा एक प्रभाग असणार आहे. तर नगराध्यक्ष हा नगरसेवकांतून न निवडता तो संपूर्ण जनतेतून निवडला जाणार आहे.प्रथम शासनाने थेट लोकांमधून निवडलेल्या नगराध्यक्षांमध्ये सन १९७४ मध्ये शिवाजी कुबल तर सन २00१ मध्ये सुलोचना तांडेल या निवडून आल्या होत्या. सन २0११ साली झालेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणूकीवेळी 4 प्रभागांमध्ये 17 वॉर्ड विभागले गेले होते तर निवडून आलेल्या नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला होता. मात्र, यावेळी नगराध्यक्ष हा थेट लोकांमधूनच निवडला जाणार असल्याने नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 17ही वॉर्डमध्ये फिरुन मतदारांच्या गाठीभेटी घेणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रचाराला सर्वाधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. नगराध्यक्ष हा थेट लोकांमधून असल्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमधील स्पर्धा कमी होणार आहे. तर शहरातील 17 वॉर्ड प्रत्येकी दोन याप्रमाणे 8 प्रभागांमध्ये 16 वॉर्ड तर 1 राखीव वॉर्ड व प्रभाग होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणतेही शासकीय परिपत्रक नसल्याचे नगरपरिषदेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)