नगर वाचनालय आता ‘आॅनलाईन’
By Admin | Updated: September 11, 2015 23:38 IST2015-09-11T22:02:28+5:302015-09-11T23:38:18+5:30
दीपक पटवर्धन: ‘लिम्स्’ सॉफ्टवेअरद्वारे वाचनालयाचे कामकाज

नगर वाचनालय आता ‘आॅनलाईन’
रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे संपूर्ण व्यवहार आता आॅनलाईन करण्यात आले आहेत. ‘लिम्स्’ सॉफ्टवेअरव्दारे वाचनालयाचे कामकाज जोडण्यात आले आहे. त्यामुळे एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध होणार असल्याची वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.वाचनालयात ८५ हजार पुस्तके आहेत. वाचनालयाचे हिशेब, वर्गणी कलेक्शन, पुस्तकांची सूची, सभासदांची सूची, पुस्तकांची देवाणघेवाण याबाबत विविध प्रकारची माहिती संगणकीकृत केली आहे. संबंधित व्यवहार वायफायव्दारे युआरएलच्या माध्यमातून जोडण्यात आले आहेत. त्यामुळे वाचनालयात आलेल्या सभासदांना मोबाईलवर पुस्तकांचे रेकॉर्ड उपलब्ध होणार आहे. लेखकांच्या किंवा प्रकाशकांच्या नावाने सर्च केले तरी पुस्तकाची पुस्तके, उपलब्धता याची माहिती मिळणार आहे. घरबसल्याही वाचकांना पुस्तकांसाठी क्लेम लावणे शक्य होणार आहे.पुस्तक १५ दिवस वाचकाला ठेवण्याची सुविधा वाचनालयातर्फे उपलब्ध आहे. त्यामुळे पुस्तक ठेवण्याचा कालावधी संपत असल्याचाएसएमएसदेखील सभासदांना मिळणार आहे. इतकेच नव्हे; तर क्लेम लावलेल्या सभासदांना पुस्तके उपलब्ध होण्याचा एसएमएसही मिळणार आहे. त्यामुळे सभासदांसाठीही योग्य माहिती तातडीने मिळणार आहे.वाचकांची कोणत्या पुस्तकासाठी सर्वाधिक पसंती आहे, नवीन आलेल्या पुस्तकांची यादी, सर्वाधिक साहित्याचा वाचक, कोणत्या पुस्तकांला सर्वाधिक मागणी आहे, हे आॅनलाईन पध्दतीमुळे कळणार आहे. त्यामुळे वाचनालयाच्या दृष्टीने तशा पध्दतीचा आढावा घेऊन वाचकांसाठी दर्जेदार पुस्तके आणणे किंवा एखाद्या पुस्तकाच्या अधिक कॉपी मागविणे, शिवाय वाचकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युनिकोडमुळे वाचकांना सोप्या पध्दतीने सर्च करून पुस्तकाचे किंवा प्रकाशकाचे नावाने पुस्तकाची उपलब्धता पाहणे शक्य होणार आहे. येत्या चार दिवसात सभासदांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याचे उद्घाटन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)