अश्लील चित्रीकरण करणाऱ्या प्राध्यापकाला चोप
By Admin | Updated: July 22, 2015 01:10 IST2015-07-22T00:55:55+5:302015-07-22T01:10:42+5:30
प्राध्यापक सांगली जिल्ह्यातील तासगावचा

अश्लील चित्रीकरण करणाऱ्या प्राध्यापकाला चोप
गुहागर : शहरातील तेलीवाडी येथे एकत्रित भाड्याने राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींच्या बाथरुममध्ये शूटिंग करणारा प्राध्यापक किरण दिनकर शिवणकर मंगळवारी रंगेहात सापडला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला यथेच्छ चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा शिक्षक सांगली जिल्ह्यातील तासगावचा आहे.
गुहागर शहरातील तेलीवाडी येथे प्राध्यापक किरण दिनकर शिवणकर (वय ३०) हा आपल्या पत्नीसोबत दुसऱ्या मजल्यावर राहात होता. याच घराच्या खालच्या बाजूला कौलारू पडवीमध्ये तालुक्यातील नरवण व इतर ग्रामीण भागातून आलेल्या पाच तरुणी एकत्रित भाड्याने राहात होत्या. किरण शिवणकर हा शृंगारतळी येथील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी गुहागरातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे.
शिवणकर याची पत्नी गेली दोन दिवस सांगली येथे घरी गेली होती. याचा फायदा घेत किरण याने दुसऱ्या मजल्यावरून खालच्या कौलारू पडवीमधील बाथरूममध्ये संगणकाला जोडला जाणारा एक छोटा कॅमेरा सोडला होता. हा कॅमेरा त्याने संगणक व लॅपटॉपला जोडला होता. या कॅमेरातून तो तरुणींचे स्नान करताना शूटिंग करत होता. मंगळवारी सकाळी ७च्या सुमारास यामधील एका मुलीला याबाबत संशय आला. तिने भिंतीच्या कोपऱ्यात हे कायलटकते आहे म्हणून ओढून बघितले तर त्याची वायर वरच्या खोलीत गेलेली दिसली.
आपली चोरी उघड होणार या भीतीने शिवणकर याने कॅमेरासह वायर वर खेचून घेतली. हा सर्व प्रकार त्या मुलीने अन्य मुलींना सांगितल्यानंतर सर्वजणींनी घरमालकांसह त्याच्या रूममध्ये घुसून जाब विचारला व कानाखाली लगावली. त्यामधील एका मुलीने आपल्या वडिलांना फोन करत सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर वडिलांनी येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला. यानुसार प्रथम शिवसेना गुहागर शहरप्रमुख सूरज सुर्वे व उपशहरप्रमुख प्रभाकर झगडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी गर्दी जमू लागली आणि जमलेल्या ग्रामस्थांनी त्या प्राध्यापकाला चांगलाच चोप दिला. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबत खबर मिळताच पोलीसही तत्काळ घटनास्थळी आले आणि त्यांनी त्या प्राध्यापकाला ताब्यात घेतले.
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही गुहागर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या विकृत प्राध्यापकावर कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन शिवसेना शहर कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महिला प्रमुख मानसी शेटे यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक गुहागर यांना दिले.
त्या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलीची जबानी घेण्यात आली. त्या प्राध्यापकाचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला होता. ज्या लॅपटॉप व संगणकाच्या सहाय्याने शूटिंग करण्यात आले होते, तो लॅपटॉप व संगणक दुपारी ३ वा. स्थानिक संगणक तज्ज्ञाच्या सहाय्याने खुला केला असता यामध्ये त्या मुलीचे व्हिडीओ (चित्रफिती) सापडल्या. यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस आशिष बल्लाळ यांच्यासह नगराध्यक्ष जयदेव मोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)