चौकुळ जुगारावरील छापा वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: July 31, 2015 01:28 IST2015-07-31T01:28:37+5:302015-07-31T01:28:37+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच चौकशी : प्राप्त रकमेपेक्षा कमी रक्कम दाखवली

चौकुळ जुगारावरील छापा वादाच्या भोवऱ्यात
सावंतवाडी : ओरोस येथील विशेष पोलीस पथकाने चौकुळ येथे टाकलेला छापा वादात सापडला आहे. या प्रकरणातील आरोपीने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड घटनास्थळी मिळाली असताना ती ७७ हजार रुपयेच दाखविल्याची तक्रार थेट कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे केली आहे. त्यांनी या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कणकवलीचे पोलीस अधीक्षक विजय खरात ही चौकशी करीत आहेत. हा छापा पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांच्यासह १२ पोलिसांनी टाकला होता.
चौकुळ येथे ६ जुलैला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांच्यासह १२ मुख्यालय पोलिसांनी जुगार अड्ड्यावर हा छापा टाकला होता. त्यात १५ आरोपींसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. यात ७७ हजार रुपयांची रोकड होती. मात्र, प्रत्यक्षात ही रोकड किमान पाच लाखांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ही रोकड दाखवली नव्हती. छापा टाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच परस्पर ही रोकड काढून घेतल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणातील आरोपीने याची थेट पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे तक्रार केली आहे. आरोपीने दोन लाख रुपयांची रोकड गाडीत ठेवली होती, त्यातील काही रक्कम पोलिसांनी काढून घेतल्याचा आरोप त्याने केला. या तक्रारीनंतर पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय श्ािंदे यांना दिले. त्यानुसार अधीक्षकांनी कणकवलीचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले आहे. त्यांनी चौकशीही सुरू केली आहे.
ही चौकशी प्राथमिक स्वरूपाची असून, त्या चौकशीत पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांचाही समावेश आहे. सध्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले असून, काही कर्मचारी बाहेरगावी असल्याने त्यांचाही जबाब नोंदविण्यात येणार आहे. या प्राथमिक चौकशीचा अहवाल ते तत्काळ पोलीस अधीक्षकांना सोपविणार आहेत.
याबाबत कणकवलीचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला. सध्या मी चौकशी करीत असून, त्याचा कालावधी मर्यादित नाही. मात्र, लवकरच हा अहवाल अधीक्षक दत्तात्रय श्ािंदे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीचे स्वरूप सांगण्यास त्यांनी नकार दिला. (प्रतिनिधी)