चिपळूण : आदिवासींनाही मिळाली हक्काची शिधापत्रिका
By Admin | Updated: October 21, 2014 23:41 IST2014-10-21T21:27:09+5:302014-10-21T23:41:00+5:30
सुवर्ण जयंती राजस्व अभियान समाधान योजनेअंतर्गत आकले ग्रामपंचायतीच्या आवारात १४० आदिवासींना शिधापत्रिका व फराळाचे वाटप

चिपळूण : आदिवासींनाही मिळाली हक्काची शिधापत्रिका
चिपळूण : ऐन दिवाळीच्या काळात आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या आदिम समाज बांधवांना आयुष्यात प्रकाश मिळावा, त्याला जगण्यासाठी आशेचा किरण निर्माण व्हावा यासाठी तहसीलदार वृषाली पाटील यांनी १४० आदिवासींना शिधापत्रिकांचे वाटप करुन दिवाळीची भेट दिली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज लांब असल्याने शासनाच्या अनेक सोयीसुविधांचा लाभ त्यांना मिळत नाही. शिक्षणापासून ते कोसो दूर असतात. अज्ञानाच्या अंधकारात बुडालेल्या या समाजाला शासनाच्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. रेशनकार्ड, जातीचे दाखले यासारख्या योजना तसेच काही मुलभूत सुविधा देण्यास शासनाचे प्रतिनिधी म्हणून माझ्या कारकीर्दीत तुम्हाला रेशनकार्डसह उद्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या फराळाने तुमचे तोंड गोड करण्यातच माझा आनंद द्विगुणित होत आहे, असे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले. आकले पंचक्रोशीतील आदिवासी समाजाला सुवर्ण जयंती राजस्व अभियान समाधान योजनेअंतर्गत आकले ग्रामपंचायतीच्या आवारात १४० आदिवासींना शिधापत्रिका व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मंडल अधिकारी दिवाकर केळुस्कर, आकले तलाठी गणेश सुर्वे, तिवरे तलाठी डी. एम. नागरगोजे, कळकवणे तलाठी ए. एस.थोरात, पिंपळी खुर्द तलाठी शुभांगी गोंगाणे, पंचायत समिती सदस्य दीपक वारोसे, आकले सरपंच संतोष कदम, तिवरे सरपंच हरिश्चंद्र शिरकर, आकले पोलीस पाटील सुरेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिराम जगताप, आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत निकम, तालुका सचिव महेश जाधव, सामाजिक संघटक सचिन मोहिते उपस्थित होते. पुरवठा अधिकारी केतन आवले यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व तहसीलदार पाटील यांनी या कामासाठी गती दिल्याने आज हा दिवस उजाडला असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही आपल्याला हे काम वेगाने करावयाचे आहे असे ते म्हणाले. सचिन मोहिते, चंद्रकांत जाधव, शशिकांत निकम, काशिराम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देताना आनंद होत असल्याचेही आवले म्हणाले. सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)
रेशनकार्डसह दिवाळीच्या फराळाने आदिवासींचे तोंड गोड करण्यात आनंदच : पाटील.
आकले परिसरातील १४० आदिवासांनी शिधापत्रिका आणि फराळाचे तहसिलदारांनी केले वाटप.
चिपळूण तालुक्यातील आकले परिसरातील आदिवासी बांधवांना तहसिलदार वृषाली पाटील यांच्याहस्ते नुकतेच शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.