चिपळूण पोलीस तिघे चोरटे अटकेत

By Admin | Updated: August 24, 2014 22:34 IST2014-08-24T21:44:56+5:302014-08-24T22:34:29+5:30

: खेर्डीतील फसलेल्या चोरीचा छडा

Chiplun police detained three thieves | चिपळूण पोलीस तिघे चोरटे अटकेत

चिपळूण पोलीस तिघे चोरटे अटकेत

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील एका किराणा मालाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून झाला होता. मात्र, या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजद्वारे गुहागर व चिपळूणमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील सूत्रधारासह अन्य ३ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संशयित आरोपींचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भंगार गोळा करणे व विकणे अशी कामे ते करीत आहेत. खेड, दापोली, गुहागर, मार्गताम्हाणे येथे झालेल्या चोरीप्रकरणात या चार संशयित आरोपींचा समावेश असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. खेर्डी येथे एका किराणा मालाचे दुकान फोडण्याचा अज्ञात चोरट्याने प्र्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये संशयित मुख्य सूत्रधार गणेश ऊर्फ टकल्या दिलीप जाधव (२०) याचे छायाचित्र असल्याचे आढळून आले.
चिपळूण पोलीस ठाण्यात पूर्वीच्या गुन्ह्यात या संशयित आरोपीचा सहभाग असल्यामुळे गणेश याला ओळखण्यात आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, संजय शिवलकर, अमोल यादव, दीपक ओतारी, उमेश भागवत, गणेश पटेकर आदींसह पोलीस पथकाने उंब्रज, पाटण, कऱ्हाड, सातारा, कोरेगाव येथे शोध घेतला असता कऱ्हाड येथे गणेश ऊर्फ टकल्या जाधव हा सापडला. त्याच्याकडून माहिती घेऊन अमोल शेळके (२२ रा. ढेबेवाडी, पाटण), फिरोज जफर शेख (१९ रा. कोरेगाव), राहुल शंकर चव्हाण (२० रा. कोरेगाव) यांचाही या चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अमोल शेळके याला ढेबेवाडी येथून व राहुल चव्हाण, फिरोज शेख यांना कोरेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी मार्गताम्हाणे चिपळूण येथे घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. रिळकर हॉस्पिटल येथून चोरीला गेलेली हिरोहोंडा मोटारसायकल चोरल्याचेही त्यांनी कबूल केले. गुहागर येथेही एक दुकान फोडल्याचे व एक दुचाकी चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. या टोळीने गुहागर येथून खेड येथे जावून १ मोटारसायकल चोरल्याचेही पोलिसांना सांगितले. चोरीला गेलेल्या २ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दापोली येथेही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित चारही आरोपींच्या टोळीने रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर येथेही घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. संशयित चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या सर्व प्रकारावरुन सातारा जिल्ह्यातील टोळीचा घरफोड्या व दुचाकी वाहन चोरी प्रकरणात सहभाग असल्याने त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Chiplun police detained three thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.