चिपळूण, पाली, लांजात उड्डाणपूल

By Admin | Updated: September 11, 2016 00:27 IST2016-09-10T23:25:56+5:302016-09-11T00:27:58+5:30

डिसेंबरपासून कामाला प्रारंभ : राजापूर वगळता सर्व वाद निकाली

Chiplun, Pali, Latang Flyover | चिपळूण, पाली, लांजात उड्डाणपूल

चिपळूण, पाली, लांजात उड्डाणपूल

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी राजापूर वगळता दोन्ही जिल्ह्यांतील वादाचे सर्व मुद्दे निकाली निघाले आहेत. चिपळूण, पाली, लांजा व कणकवली येथे उड्डाणपूल होणार आहेत, तर सिंधुदुर्गमधील वागदे, कुडाळ येथे चौपदरीकरणाची रुंदी ४५ मीटर्स ठेवण्याचा निर्णयही मान्य झाला आहे. खासदार विनायक राऊत यांनी आज (शनिवारी) प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशाचे दर्शन घेण्यासाठी खासदार राऊत रत्नागिरीत आले असता, प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांच्यासोबत सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत व अन्य पक्षपदाधिकारी उपस्थित होते. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूसंपादनाबाबतची कार्यवाही जोरात सुरू आहे. भूसंपादनाबाबतची कार्यवाही पूर्ण होत आल्याने येत्या डिसेंबर महिन्यात चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे राऊत म्हणाले.
बावनदी ते संगमेश्वर हा रत्नागिरी जिल्ह्यातील तर कणकवली ते कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग भाग खड्डेमय बनल्याने गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्यात आले. मात्र, त्यामुळे वाहतुकीला फारसा दिलासा मिळालेला नाही. गणेशभक्तांना खाचखळग्यातूनच प्रवास करावा लागल्याचे प्रसारमाध्यमांनी खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान पूर्ण दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जातील, असे खासदार राऊत म्हणाले.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे डोंगराळ भागात येतात. त्यामुळे येथील भौगोलिक स्थितीचा विचार करून विकासकामांबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी ६०० प्रमाणे १२०० साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्यावरील खर्चासाठी स्वतंत्र शीर्षकांतर्गत निधीची व्यवस्था नाही. शासनाने दोन्ही जिल्ह्यांतील साकव दुरुस्तीस निधीची व्यवस्था केल्यास साकवांची समस्या मार्गी लागेल, असे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)


सी - वर्ल्डला विरोध योग्यच...
मालवण तालुक्यातील तोंडवळी-वायंगणी येथे प्रस्तावित असलेल्या सी -वर्ल्ड प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्या गावातील जागा सुपीक असल्याने लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प देवगड तालुक्यातील मुणगे किनाऱ्यावर किवा वेंगुर्लेमध्ये होऊ शकेल. देवगडमध्ये २००७ पासून रखडलेला ९० कोटी खर्चाचा आनंदवाडी फिशिंग हार्बर प्रकल्प आता मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे याच तालुक्यातील मुणगे येथील किनाऱ्यावर सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्यास तेथील ग्रामस्थही अनुकुल आहेत. देवगड-मुणगेप्रमाणेच वेंगुर्ले तालुक्यातही या प्रकल्पासाठी जागा पाहणी केली जाणार आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.
पनवेल-रत्नागिरी रेल्वे कायम होणे शक्य
गणेशभक्तांना परतीसाठी रत्नागिरी ते पनवेल दरम्यान रेल्वेगाडी सोडण्यात आली आहे. ही गाडी कायम होण्याची शक्यता आहे. तर वसई ते सावंतवाडी अशी कायमस्वरूपी रेल्वेगाडी सुरू करावी, अशी विनंती आपण कोकण रेल्वे चेअरमन संजय गुप्ता यांच्याकडे केली आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चाही झाल्याचे खासदार राऊत म्हणाले.

Web Title: Chiplun, Pali, Latang Flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.