चिमणराव कदम यांना धमकावणारा ताब्यात
By Admin | Updated: July 8, 2014 23:22 IST2014-07-08T22:43:08+5:302014-07-08T23:22:07+5:30
संशयित झिरपवाडीचा : दुधेबावीत पकडले

चिमणराव कदम यांना धमकावणारा ताब्यात
फलटण : माजी आमदार चिमणराव कदम यांना शिवीगाळ करुन धमकावणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रमेश गुंजवटे असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ७ रोजी दुपारी सवादोनच्या सुमारास माजी आमदार चिमणराव कदम यांच्या मोबाईलवर अज्ञाताने कॉल केला. यावेळी अज्ञाताने कदम यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या घटनेची तक्रार व मोबाईलवर आलेला नंबर कदम यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिला.
त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. त्यावेळी संबंधित नंबर हा झिरपवाडी, ता. फलटण येथील असल्याचे निष्पन्न झाले. तो नंबर एका महिलेच्या नावावर होता. चौकशीअंती त्या नंबरवरून गावातील रमेश गुंजवटे याने फोन केल्याचे आढळून आले. रमेश गुंजवटे हा पूर्वाश्रमीचा कदम यांचा कार्यकर्ता होता.
पोलिसांनी संशयावरून रमेश गुंजवटेला दुधेबावी, ता. फलटण येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब फडतरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)