बालकलाकार आर्यन प्रजापती चिपळूणमध्ये

By Admin | Updated: October 30, 2015 23:20 IST2015-10-30T21:44:53+5:302015-10-30T23:20:26+5:30

आज देवरूखात : एसीबी इंटरनॅशनल स्कूल व एसीबी प्ले स्कूलकडून नियोजन

Child artist Aryan Prajapati in Chiplun | बालकलाकार आर्यन प्रजापती चिपळूणमध्ये

बालकलाकार आर्यन प्रजापती चिपळूणमध्ये

चिपळूण : जागतिक दर्जाचे शिक्षण नव्या पिढीला देण्याचा ध्यास घेतलेल्या इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीच्या एसीबी इंटरनॅशनल स्कूल व एसीबी प्ले स्कूलने काही महिन्यांपूर्वीच येथील विद्यार्थ्यांचा ‘गुगल बॉय’ कौटिल्य पंडितशी संवाद घडवून आणला. शनिवार दि. ३१ रोजी देवरुख व रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी चिपळूण व खेड येथे बालकलाकार आर्यन प्रजापतीच्या अभिनयाची झलक विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
सब टिव्हीसह अनेक मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या व ‘बागी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला आर्यन चिपळूणसह खेड व देवरुखमध्ये येत आहे. एसीबी इंटरनॅशनल स्कूलने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आर्यनसोबत नृत्य करता येणार आहे व सेल्फीही काढता येणार आहे. आर्यनच्या जिल्ह्यातील या पहिल्याच भेटीची माहिती एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अमोल भोजने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील बहादूरशेख नाका येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीचे संचालक चंद्रकांत भोजने, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला फैसल, नीलेश महाडिक, रंजित भोजने, गुणवत्ता अधिकारी नेहा महाडिक, मुख्याध्यापक सतीश जाधव, मुख्याध्यापिका रुबिना कुरेशी आदी उपस्थित होते.
शनिवार दि. ३१ रोजी सायंकाळी ६ वाजता देवरुख येथील माटे-भोजने सभागृहात आर्यन विद्यार्थ्यांना भेटणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन एसीबीच्या देवरुख शाखाप्रमुख शगुफ्ता शेख यांनी केले आहे. रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी चिपळुणातील लक्ष्मीबाई माटे सभागृहात तर सायंकाळी ६ वाजता एसीबी प्ले स्कूल, खेड येथे आर्यन विद्यार्थ्यांना भेटणार आहे. खेड शाखेचे सुहास नलावडे, उमेश महाडिक यांनी नियोजन केले आहे. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
चिपळूण येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्याधिकारी पंकज पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, अजय कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)


चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभियानाची चुणूक दाखवणारा आर्यन रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांनाच वेड लावले आहे. त्याच्यासमवेत बालदोस्तांचा संवाद घडावा. त्याच्याकडून नवीन गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीच्या एसीबी इंटरनॅशनल स्कूल व एसीबी प्ले स्कूलने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातून जिल्ह्यातील बालदोस्तांना आर्यनला भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यासोबत गप्पाही मारता येणार आहेत.


सब टीव्हीसह अनेक मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची दाखवली चुणूक.
‘बागी’ चित्रपटाच्या माध्यमातून बालदोस्तांच्या भेटीला.
आर्यनसोबत नृत्य करण्याची बालदोस्तांना एक संधी.
कार्यक्रमादरम्यान सेल्फीही काढण्याची सर्वांना संधी.

Web Title: Child artist Aryan Prajapati in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.