मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही
By Admin | Updated: August 25, 2014 00:13 IST2014-08-25T00:12:42+5:302014-08-25T00:13:21+5:30
लक्ष्मण माने : ‘बंद’मध्ये सहभाग घेऊन शासनाचा निषेध करणार

मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही
कोल्हापूर : काँग्रेस सरकारने भटक्या विमुक्तांसारख्या दुर्बल घटकांना गेली अनेक वर्षे फसविले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कोल्हापुरात पाय ठेवू दिला जाणार नाही तसेच कोल्हापूरच्या टोलविरोधी बंदमध्ये सहभाग घेऊन शासनाचा निषेध करणार, असा इशारा भटक्या विमुक्त जमाती संघटना अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
माने म्हणाले, हजारो एकर जमीन सरकारकडे पडून आहे. ती गरीब लोकांना मिळावी. आमच्याबरोबर भूमिहीन शेतमजुरांना जमीन द्या, बेघरांना घरासाठी जागा द्या, अशी हजारो निवेदने शासनाला गेली ५० ते ६० वर्षे आम्ही देत आहोत. भटक्या विमुक्त्यांच्या बेचाळीस जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत करा, आदिवासींना सवलती द्या, अशी शिफारस न्यायमूर्ती बापट आयोगाने दिल्या. त्या शासनाने धुडकावून नवीन आयोग नेमला. त्यामुळे भटक्या विमुक्तांना वाऱ्यावर सोडले आहे, राज्यकर्त्यांना याची जाण नाही. सरकार धनदांडग्यांना खाऊ घालत आहे. आता दिसेल त्या सरकारी जागेवर मोकळ्या पडलेल्या शेतजमिनींवर कब्जा मिळवण्यासाठी भूमी मुक्ती आंदोलन सुरू केलेले आहे. आता सरकारला हिसका दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. पक्षाच्यावतीने सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्याविरोधात उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्याचबरोबर टोलविरोधी प्रश्नातही सहभागी होणार असून मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पार्टीचे जगन्नाथ जाधव, शाबू दुधाळे, महाराष्ट्र विकास आघाडीचे अनिल म्हमाणे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)