मुख्यमंत्री दौऱ्यात मनसे रस्त्यावर
By Admin | Updated: January 9, 2015 00:05 IST2015-01-08T21:38:31+5:302015-01-09T00:05:23+5:30
परशुराम उपरकर : जिल्ह्यातील समस्यांबाबत निर्णय घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री दौऱ्यात मनसे रस्त्यावर
कणकवली : सध्या युतीच्या नेत्यांनी विविध घोषणा सुरू केल्या आहेत. त्या किती सत्यात उतरतात ते मनसे पाहणार आहे. आम्ही जिल्ह्यांतील समस्यांसंदर्भात निवेदन देणार आहोत. त्याची उत्तरे न मिळाल्यास मनसे मुख्यमंत्री दौऱ्यापूर्वी रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहावर मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर उपरकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, धीरज परब, जयसिंग नाईक, भारती रावराणे, चैताली भेंडे, तेजल लिंग्रस, समीर आचरेकर, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते. उपरकर म्हणाले की, येत्या सोमवारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मनसेचे संबंधित तालुकाध्यक्ष निवेदने देणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या ४० टक्के निधीला कात्री लागली आहे.हत्ती नुकसानभरपाई, भातशेती नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. राज्यात ७५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर पाच हजार पेक्षा जास्त गावे दुष्काळग्रस्त आहेत. असे असताना शासकीय सिंधुमहोत्सव साजरा करण्यापेक्षा जिल्ह्याला शंभर टक्के निधी द्यावा.
जिल्हाध्यक्ष प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. जो निधी विदर्भाला वळवला जातोय तो निधी जिल्ह्यासाठी ठेवा. सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्प आधी पूर्ण करा. मगच मराठवाड्याला पाणी द्या. आंबा, काजू नुकसानभरपाई द्या, अशा मागण्या निवेदनातून करण्यात येणार आहेत. महसूल नगररचना अधिनियम १६६ अन्वये जिल्ह्यातील सुमारे आठ-दहा हजार घरांना घरे जमिनदोस्त करा अन्यथा दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा मागे घेण्याबरोबरच या घरांना नियमानुकूल करा. अतिरीक्त जिल्हाधिकारी पद सहा महिने रिक्त असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांकडे बंदर विकास मंत्रालयही असल्याने आरोंदा जेटीचा प्रश्नही मांडणार आहे.
या प्रश्नांची तड लावूनच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात यावे, असे उपरकर म्हणाले. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांची निवासी कार्यशाळा घेणार
येत्या १७ आणि १८ जानेवारी रोजी मनसेच्या विभागअध्यक्ष स्तरापर्यंतच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवासी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी परशुराम उपरकर यांनी दिली.