बालेकिल्ल्यात सेनेला कडवे आव्हान
By Admin | Updated: September 23, 2014 00:17 IST2014-09-22T22:36:59+5:302014-09-23T00:17:03+5:30
पक्षातील नाराज गटाबरोबरच विरोधकांचा सामना करावा लागणार

बालेकिल्ल्यात सेनेला कडवे आव्हान
शिवाजी गोरे -दापोली-- दापोली तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली २५ वर्षे शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी या मतदारसंघात निवडून येत आहेत. यावेळी ते षटकार मारण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु यावेळी त्यांना पक्षातील नाराज गटाबरोबरच विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच विजयासाठी त्यांना यावेळी कसरत करावी लागणार आहे.
दापोली तालुका हा कधी काळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु १९९०च्या निवडणुकीत विद्या बेलोसे या काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात अॅड. बाळ बेलोसे यांनी बंडखोरी केली. पती- पत्नीच्या वादात शिवसेनेला लॉटरी लागली. तेव्हापासून आजतागायत शिवसेनेने पराभव पत्करला नाही. सलग पाचवेळा दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार सूर्यकांत दळवी विजयी होत गेले. आता षटकार मारण्याच्या तयारीत असतानाच पक्षातून बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे संजय कदम, किशोर देसाई, मनसेचे वैभव खेडेकर यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार दळवी यांना या निवडणुकीत पक्षातून बाहेर पडलेल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांशी सामना करायचाच आहे, त्याचबरोबर पक्षातील नाराज गटावरसुद्धा मात करावी लागेल. पक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे हाताळणारे भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, राजेंद्र फणसे हे निष्ठावंत शिवसैनिक यावेळी बरोबर नाहीत. त्यांच्या मदतीशिवाय निवडणूक लढायची आहे. त्यांच्या नाराजीचा निवडणुकीत परिणाम जाणवेल. विशेष म्हणजे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची मर्जी ते कशा प्रकारे राखतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे कदम यांना तिकीट न मिळाल्यास कदम गट कितपत मदत करतो, यावर बरंच काही अवलंबून आहे. यावेळी कुणबी समाजाने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा बराचसा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला दापोली विधानसभा मतदारसंघात २५ वर्षे अपयश येत असल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला. हे दोन स्पर्धक एकेकाळचे शिवसैनिक असल्याने शिवसेनेची राजनीती त्यांना अवगत आहे. काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला नाही, तरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून सुजित झिमण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीचा कोण उमेदवार असेल, यावर बरंच काही अवलंबून आहे. दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म किती पाळतात, यावर शिवसेनेची गणिते ठरणार आहेत.
शिवसेना-भाजप युती आता अटीतटीच्या ठिकाणावर पोहोचली आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात का, यावरही शिवसेना उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.