भाजप सरकारकडून फसवणूक
By Admin | Updated: September 29, 2014 00:02 IST2014-09-29T00:00:30+5:302014-09-29T00:02:44+5:30
नारायण राणे : कणकवलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात टीका

भाजप सरकारकडून फसवणूक
कणकवली : देशात ५२ वर्षे कॉँग्रेसची सत्ता होती. कॉँग्रेसने देश घडविला. मात्र, आमिषे दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने १२० दिवसांत जनतेची फसवणूक केली, असे प्रतिपादन पालकमंत्री नारायण राणे यांनी केले. नीतेश राणे यांनी कॉँग्रेसतर्फे अर्ज दाखल केल्यानंतर मराठा मंडळ सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नीलम राणे, नगराध्यक्षा अॅड.प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते.
अच्छे दिन आने वाले है, महागाई कमी करू, असे लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. मात्र, महागाई कमी करण्यात आली नाही आणि अच्छे दिन आलेच नाहीत. उलट ३० टक्के महागाई वाढली आणि वाईट दिवस पाहण्याची वेळ देशाच्या जनतेवर आली आहे. एकशेवीस दिवसांत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. वातावरण बदलत असले तरी गाफील राहू नका. लोकसभेच्या वेळी गाफील राहिल्याने नॉनमॅट्रिक असलेला माणूस खासदार झाला. आज हा खासदार इथल्या माणसांसाठी दुर्मीळ झाला आहे. तो फक्त थापा मारण्यात एक्स्पर्ट आहे, अशी खासदार विनायक राऊत यांच्यावर पालकमंत्री नारायण राणे यांनी केली. याउलट मतदारसंघात महिन्याचे वीस दिवस देऊन नीलेश राणे यांना अपयश आले याचे दु:ख आहे. लोकसभेत जे कटु अनुभव आले त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. (प्रतिनिधी)
‘त्यांचा’ मुलाहिजा ठेवणार नाही
या निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होताना तुम्हा कार्यकर्त्यांसाठी मी भरपूर वेळ देईन. विरोधक आणि गद्दारांची लक्तरे काढीन, असे नारायण राणे यांनी सांगितले. खाल्ल्या अन्नाला न जागणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे राजन तेली यांचे नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी टीका केली.