पाठलाग करत अज्ञातांकडून कारवर हल्ला

By Admin | Updated: September 22, 2014 01:00 IST2014-09-22T00:57:59+5:302014-09-22T01:00:15+5:30

महामार्गावरील मळगाव येथील घटना : दाम्पत्य थोडक्यात बचावले

Chasing people car attacked by unknown criminals | पाठलाग करत अज्ञातांकडून कारवर हल्ला

पाठलाग करत अज्ञातांकडून कारवर हल्ला

सावंतवाडी : एखाद्या चित्रपटाला शोभेल असा थरार शनिवारी रात्री आरोंदा येथील शिरोडकर दाम्पत्यास अनुभवायास मिळाला. कुडाळ येथून आरोंद्याकडे निघालेल्या शिरोडकर यांच्या कारची झारापपासून पाठलाग करत मळगाव येथे कारवर शिगेने हल्ला करण्यात आला. कारचा दरवाजा न उघडल्याने कारमधील शिरोडकर दाम्पत्य थोडक्यात बचावले. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात कारचालक संजय रेडकर यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोंदा येथील अविनाश शिरोडकर व त्यांची पत्नी विना अविनाश शिरोडकर, सून ज्योती केदार शिरोडकर अशी तिघेजण शनिवारी सकाळी कुडाळ येथील खासगी रूग्णालयात अविनाश शिरोडकर यांच्या हृदयविकाराच्या तपासणीसाठी गेले होते. कुडाळ येथून रात्री १० वाजण्याच्या सुमारास अल्टो कार (जी.ए. ०३ एच ७८६५) ने बाहेर पडले. यावेळी चालक म्हणून संजय मनोहर रेडकर हा सोबत होता. त्यांची कार १०.१५ वाजण्याच्या सुमारास झाराप पत्रादेवी महामार्गानजीक आली असता, झाराप येथे काळोखाचा फायदा घेत पल्सर या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन युवकांनी दुचाकी कारच्या आडवी घातली. तसेच कारमधील शिरोडकर यांना शिवीगाळ केली. पाच मिनिटे हा प्रकार सुरू होता. त्यानंतर दुचाकीस्वारांनी दुचाकी पाठीमागे घेत कारला पुढे जायला दिले.
कारचालक संजय रेडकर याने त्याच मार्गाने कार पुढे नेली. यावेळी त्यांच्यामागे हे दुचाकीस्वार स्वत:च्या दुचाकीची लाईट बंद करून मागून येत होते. कार आरोंदा येथे जाण्यासाठी मळगाव पुलाखालून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच कार पुलाच्यानजीक असलेल्या व्यायामशाळेकडे आली असता, तेथे स्पीडब्रेकरवरून कार हळू करण्याच्या नादात पुन्हा ते दुचाकीस्वार कारसमोर आले आणि मोठ्याने हावभाव करू लागले. या प्रकाराने कारमधील शिरोडकर दाम्पत्याने आरडाओरडा सुरू केला. त्यातच दुचाकीवरून आलेल्या तिघा युवकांनी तोंडाला रूमाल बांधला होता. कारचा दरवाजा उघडा, असे म्हणत त्यांनी कारवर शिगेने जोरदार हल्ला केला. मात्र, चालक रेडकर यांना काहीतरी गंभीर घडतेय, याची जाणीव झाल्याने दरवाजा उघडला नाही.
बराच वेळ कारच्या पुढे मागे शिगेने हल्ला करत कारचे नुकसान केले. यावेळी शेजारच्या घरातून कोण तरी येत आहे. हे पाहून दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरले. याबाबत रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कारचालक संजय रेडकर याने सावंतवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्याप्रमाणे पोलिसांनी अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल केला व हा तपास कुडाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
हा प्रकार झाराप येथून सुरू झाला आणि झाराप हे कुडाळ पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने हा तपास कुडाळ पोलिसांकडे वर्ग केल्याचे सावंतवाडी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा प्रकार दरोड्याचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, आतापर्यंतचा हा या महामार्गावरील तिसरा प्रकार आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी केली. तसेच तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार ही दुचाकी काळ्या रंगाची असल्याने या दुचाकीचा शोध सर्वत्र घेण्यात येत होता. (प्रतिनिधी)
महामार्गावरील धोका वाढला
झाराप पत्रादेवी महामार्गावरील गाडीचा पाठलाग करणे, गाडी लुटणे हा वर्षभरातील तिसरा प्रकार आहे. अद्यापपर्यंत मागील गुन्ह्यातील आरोपी मिळाले नसून या नव्या प्रकाराने पोलिसांची आणखी डोकेदुखी वाढणार आहे. तसेच या महामार्गावरील धोकाही आता वाढू लागला आहे.
आरोंदा संघर्ष समितीकडून निषेध
अविनाश शिरोडकर हे आरोंदा संघर्ष समितीचे पदाधिकारी असून, त्यांच्यावरच हल्याचा प्रयत्न झाल्याने गावात रविवारी याबाबत सायंकाळी उशिरा बैठक घेण्यात आली. तसेच या हल्ल्याचा निषेध करत कितीही हल्ले झाले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा आरोंदा संघर्ष समितीकडून घेण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर गावात यावर तीव्र पडसाद उमटत आहेत.
 

Web Title: Chasing people car attacked by unknown criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.