महिला शिक्षकांसमोर आव्हाने
By Admin | Updated: March 23, 2015 00:35 IST2015-03-22T23:08:03+5:302015-03-23T00:35:33+5:30
परिस्थिती बिकट : भौगोलिक परिस्थितीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महिला शिक्षकांसमोर आव्हाने
शृंगारतळी : रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जंगले तुडवत गेल्याशिवाय शाळांपर्यंत पोहोचता येणे अशक्य बनले असून, काही ठिकाणी महिला शिक्षकांना तेथे पोहोचणेही जिकीरीचे बनले आहे. अशा परिस्थितीतही तेथे अध्यापनाचे काम सुरू आहे. मात्र, हे करताना सुरक्षेचे प्रबंध करावेत, अशी मागणी काही ठिकाणाहून केली जात आहे. अनेक ठिकाणी अशा शाळांवर जाणाऱ्या महिला शिक्षिकांची हेळसांड होत असल्याने अशा शिक्षकांच्या सुविधांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अशा शाळांचा अहवाल तयार करून तेथे कार्यरत असणाऱ्या शिक्षक अथवा महिला शिक्षकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या भागातून होत आहे. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही नाईलाजाने काम करावे लागत असून, किनाऱ्यालगतच्या गावातून असलेल्या शाळांमध्येही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. जिल्हयाच्या समुद्राच्या खाडी किनारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करणाऱ्या महिला शिक्षकांची या परिस्थितीमुळे हेळसांड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या महिला शिक्षकांनी पंचायत समितीकडे दाद मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या संर्दभात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे़ मात्र, रत्नागिरी जिल्हयातील समुद्राच्या खाडीलगत असणाऱ्या प्राथमिक शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी व राजापूर येथील परिस्थिती संवेदनशील बनत असून, अशा महिला शिक्षकांवर भौगोलिक सुविधा नसतानाही काम करण्याची यानिमित्ताने वेळ येत आहे. नाईलाजास्तव ठिकाणी अध्यापनाचे काम करावे लागत असल्याने महिलांचे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ त्यामुळे आपोआपच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे़ बहुतेक ठिकाणी चढउतार व जंगलाची वाट तुडवत शाळेत जावे लागत आहे़ काही ठिकाणी बोटीने प्रवास करून खाडी पार करावी लागत असल्याचेही चित्र आहे.
जिल्ह्यातील अशा विविध गावात कसल्याच सुखसोयी व राहण्याची व्यवस्था नसल्याने दूर अंतरावरून ये-जा करण्याची वेळ महिला शिक्षकावर आली आहे. अशीच एक, अडगळीच्या ठिकाणी गुहागर तालुक्यातील काताळे नवानगर उर्दू शाळा आहे़
ही परिस्थिती पाहता महिला शिक्षकांना याठिकाणी अध्यापनाचे काम करणे जिकीरीचे आहे़ त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने यांसारख्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
दुर्गम भागात शिक्षकांसमोर अडचणी
कोकणातील डोंगरी भागातील शाळांमध्ये जाणाऱ्या शिक्षिकांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडली. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिक्षिका त्रस्त आहेत. जिल्हा परिषदेने अशा शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. महिला सुरक्षा शिफारसींची अंमलबजावणी हवी, अशी मागणी होत आहे.