प्रमाणपत्राने केला दोन कोटीचा घोटाळा
By Admin | Updated: October 5, 2014 23:03 IST2014-10-05T21:49:55+5:302014-10-05T23:03:16+5:30
दोन सहकारी बँकांमध्ये सुवर्णकारांनी दिलेल्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर

प्रमाणपत्राने केला दोन कोटीचा घोटाळा
रत्नागिरी : सोनाराच्या खोट्या प्रमाणपत्राने कोकण मर्कंटाईल बँकेमध्ये दोन कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांचा घोटाळा केला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील बनावट सोने तारणाची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व भंडारी बँक अशा दोन सहकारी बँकांमध्ये सुवर्णकारांनी दिलेल्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर झालेला घोटाळा उघडकीस आला होता.
सोने तारण ठेवून सहजपणे कर्ज मिळत असल्याने अनेकजण या कर्जालाच पसंती देतात. उर्वरित कर्जांसाठी कागदपत्रांची जंत्री लागत असल्याने तसेच त्यानंतरही कर्जासाठी अनेक अडचणी उभ्या राहात असल्याने सोनेतारण कर्ज हा स्वस्त पर्याय ठरत आहे. मात्र, त्यातही खरे सोने तारण न ठेवता बँकेने नेमलेल्या सुवर्णकाराला हाताशी धरुन त्याच्याकडून खोटे प्रमाणपत्र घेऊन खोट्या सोन्यावरच कर्ज लाटण्याचा डाव बँकेच्या काही ग्राहकांकडून खेळला जात असल्याचे दिसून येते.
रत्नागिरीतील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व भंडारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून लाखोंचा अपहार केल्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर आता कोकण मर्कंटाईल बँकेतही असाच प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सोनेतारण कर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तारण ठेवण्यात येणाऱ्या सोन्याविषयी कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळेच सुवर्णकाराला नेमले जाते. या सुवर्णकाराकडूनच खोटे प्रमाणपत्र मिळत असल्याने संगनमताने हा कर्जव्यवहार केला जात असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे कोकण मर्कं टाईल बँकेत २ कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ एवढ्या रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जवितरण होईपर्यंत हे दागिने खरे वा खोटे याची सोनार तसेच बँक प्रशासनाला माहितीच नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कर्जाची भानगड नाही
बनावट सोने तारण ठेवल्याने अनेक फायदे मिळतात. भविष्यात कर्ज बुडाल्यास बँकेच्या नियमाप्रमाणे या दागिन्यांचा लिलाव होतो. तारण ठेवलेलीच वस्तूच खोटी असल्याने ती लिलावात विकली गेल्यास त्याबाबत ग्राहक निर्धास्त असतो. त्यामुळे बनावट सोनेतारण करण्याकडे आता ग्राहकही सराईतपणे धजावू लागले आहेत. विशेष म्हणजे बँक प्रशासनही त्याबाबत बेफिकीर आहे.