सतर्क पोलीस : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक लांजात रंगले, बघ्यांची मोठी गर्दी

By Admin | Updated: May 29, 2015 23:56 IST2015-05-29T22:18:17+5:302015-05-29T23:56:00+5:30

महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गॅसची गळती झाल्याचे समजताच अनेकजण आपल्या नाकावर रुमाल बांधून पुढे जाण्याचे धाडस करत होते.

The cautious police: Disaster management's demonstration, the large crowd watching | सतर्क पोलीस : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक लांजात रंगले, बघ्यांची मोठी गर्दी

सतर्क पोलीस : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक लांजात रंगले, बघ्यांची मोठी गर्दी

अनिल कासारे - लांजा -एस. टी. आणि टँकर यांच्यात पंजाबी हॅपी धाबा येथे समोरासमोर टक्कर झाली. यामुळे गॅसची गळती होऊन एस. टी.ने प्रवास करणारे अनेक प्रवासी बेशुद्ध पडल्याचा फोन महसूल विभागाने लांजा पोलीस स्टेशनला केला. यानंतर एस. टी. प्रशासनाचे अधिकारी, आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गॅसची गळती झाल्याचे समजताच अनेकजण आपल्या नाकावर रुमाल बांधून पुढे जाण्याचे धाडस करत होते.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा गॅसवाहू टँकर व लांजाहून रत्नागिरीकडे जाणारी एस. टी. यांच्यात हॅपी धाबा येथील वळणावर अपघात होऊन गॅसची गळती झाली. त्यामध्ये ७ ते ८ जण बेशुद्ध पडल्याचे दिसून येत होते. दुपारी १२.५६ वाजता दोन वाहनांमध्ये धडक होताच कसला तरी आवाज होवून रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पावडरचा सडा पडला होता. स्फोट झाल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांची तर मोठी धावपळ उडाली. काहींनी आपल्या मोटारसायकल सोडून धूम ठोकली, तर मोठ्या गाड्यातील प्रवाशांनी गाड्या उभ्या करुन पळ काढला. अपघात झाल्याची खबर प्रथम तहसील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालयाने लांजा पोलिसांना दिली. लांजा पोलीस ठाण्यात असणारे ठाणे अंमलदार शशिकांत सावंत यांनी रुग्णवाहिका १०८, लांजा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. एस. टी. प्रशासनाला माहिती देण्यात आल्यानंतर एस. टी. प्रशासनाचे अधिकारी एस. टी.ची गाडी घेऊन दाखल झाले. तहसीलदार दशरथ चौधरी, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ व त्यांचे मंडल अधिकारी नगरपंचायतीचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
महामार्गावर वाढत असलेली गर्दी पाहून लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय उकर्डे, बंड्या मसूरकर, वाहतूक शाखेचे संतोष झापडेकर, ठाणे अंमलदार शशिकांत सावंत यांनी गर्दी रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. घटनास्थळी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसची रुग्णवाहिका दाखल झाली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिका व तिच्याच पाठोपाठ लांजा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका दाखल झाली. १५ मिनिटांच्या कालावधीत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर गाड्यांमध्ये अडकून बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोक व रुग्णवाहिकांचे चालक यामध्ये १०८चे डॉ. गिरिजा शेट्ये, चालक रवींद्र वाघाटे, राष्ट्रवादी काँग्रेस रुग्णवाहिकेचे चालक रणजीत सार्दळ, लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालक दीपक वाघाटे आदींनी बेशुद्ध प्रवाशाला बाहेर काढून रुग्णवाहिकेत ठेवले. अपघात घडल्यानंतर ३० ते ३५ मिनिटांच्या कालावधीत सतर्क असणाऱ्या सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, यामध्ये पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, अधिकारी नव्हते.
अपघात घडल्यानंतर सतर्क असणाऱ्या यंत्रणेचा अंदाज घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीचे निरीक्षक प्रमोद जाधव, सतीश गिरप, लांजा तहसीलदार दशरथ चौधरी यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वी पार पाडले. अपघात घडल्यानंतर अपेक्षित असणाऱ्या वेळेमध्ये सर्वच यंत्रणा उभी राहिल्याने समितीचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: The cautious police: Disaster management's demonstration, the large crowd watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.