कासारटाका पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल

By Admin | Updated: July 16, 2014 00:25 IST2014-07-16T00:21:27+5:302014-07-16T00:25:15+5:30

धबधबे, जलस्त्रोत प्रवाही : धामापूरमधील नवसाला पावणारे देवस्थान

Casarateca tourists crowded houses | कासारटाका पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल

कासारटाका पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल


अमोल गोसावी : चौके
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मालवण तालुक्यातील धामापूरमधील नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री देव कासारटाका देवस्थान या आठवड्यापासून पावसामुळे धबधबे आणि इतर जलस्त्रोत वाहू लागल्याने भाविकांच्या आणि पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसू लागले आहे.
कोंबडा, बकरा आणि मद्याने नवसफेड होत असल्याने कासारटाक्याला बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. चौके धामापूर मार्गावर गोड्याच्यावाडीनजिक निसर्गाच्या कुशीत रस्त्याकडेला असलेले देवस्थान तसेच धामापूर तलावानजिक असलेले देवस्थान हे दोन्ही देव कासारटाक्याची देवस्थाने असून याठिकाणी पावसाळ््याच्या दिवसात नवस फेडण्यासाठी आणि नवस करण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भाविक मोठी गर्दी करीत आहेत. परंतु सध्या श्रद्धेपेक्षा दारू-मटणाची पार्टी करून मजा करण्याचा पिकनिक पॉर्इंट अशा विचाराने अनेक पर्यटक याठिकाणी येतात. त्यातील काही अतिउत्साही तळीराम दारू पिऊन दिवसभर धिंगाणा घालतात. त्याचा त्रास येथून जवळच राहणाऱ्या गोड्याच्या वाडीतील ग्रामस्थांना आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
पोलीस बंदोबस्त अपुरा
नवसाला पावणाऱ्या कासारटाका देवस्थानची ख्याती दूरवर पसरल्यामुळे याठिकाणी दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मद्यपी लोकांमुळे वाद होत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. परंतु वाढत चाललेल्या गर्दीचा आणि कासारटाका देवस्थानचा विस्तृत परिसर लक्षात घेता याठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त आणि फिरता बंदोबस्त ठेवणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळे या मद्यपींवर अंकुश ठेवता येईल.
गेल्या काही वर्षात याठिकाणी दारू पिऊन मौजमजा करून परतीच्या प्रवास करताना अनेक अपघात होऊन काहीजणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. म्हणून हे दुष्परिणाम रोखण्यासाठी या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांवर आणि अतिउत्साही पर्यटकांवर निर्बंध लादणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे देवस्थान रस्त्यानजिक असल्याने याठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनांची रांगच
रांग लागलेली असते. त्यामुळे या ठिकाणी दुपारच्यावेळी वाहतुकीचा खोळंबाही होतो. असे असले तरी कासारटाक्याची ख्याती सर्वदूर पसरल्याने याठिकाणी दिवसेंदिवस गर्दी मात्र वाढत आहेत.

Web Title: Casarateca tourists crowded houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.