कासारवेली येथे अपघातानंतर वाहक-चालकास मारहाण
By Admin | Updated: July 7, 2015 01:01 IST2015-07-07T01:00:44+5:302015-07-07T01:01:43+5:30
सात तास वाहतूक ठप्प : वृद्धाच्या पायावरून गेले बसचे चाक

कासारवेली येथे अपघातानंतर वाहक-चालकास मारहाण
रत्नागिरी : तालुक्यातील साखरतर येथे एका वृद्धाच्या पायावरून एस.टी. बसचे चाक गेल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने बसचालक आणि महिला वाहकाला जोरदार मारहाण केली. या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या एस.टी. चालक-वाहकांनी बसफेऱ्या बंद केल्याने तब्बल सात तास शहरी आणि सहा तास ग्रामीण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यात असंख्य प्रवाशांचे विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले. सकाळी दहा वाजता बंद झालेल्या बसफेऱ्या सायंकाळी पाच वाजता पूर्ववत झाल्या.
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात जैनुद्दीन शिरगावकर (वय ६५, रा. साखरतर) जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांनी बसचालक सचिन सावंत आणि वाहक मयूरी सुर्वे यांना बेदम मारहाण केली. जोपर्यंत जखमीवर उपचार होत नाहीत, तोपर्यंत चालक-वाहक आणि बस जागची हलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तोपर्यंत घटनास्थळी पोहोचलेल्या एस. टी. अधिकाऱ्यांनी शिरगावकर यांना शासकीय रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाल्यानंतर बस अपघातस्थळावरून सोडण्यात आली.
या मारहाणीचे वृत्त तत्काळ रत्नागिरी एस. टी. आगारापर्यंत आले. त्यामुळे चालक-वाहक एकत्र झाले आणि त्यांनी शहरी बस वाहतूक बंद केली. सकाळी दहा वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प झाली. पाठोपाठ अकरा वाजता ग्रामीण फेऱ्याही बंद करण्यात आला. चालक-वाहकाला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी करीत सर्वच चालक-वाहकांनी चक्काजाम केला.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत चालक-वाहकांची समजूत काढली. चर्चेच्या तब्बल तीन फेऱ्यांनंतर चालक-वाहकांनी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची तयारी दर्शविली आणि पाच वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)