परब कुटुंबियांसाठी कारिवडेवासीय एकत्र

By Admin | Updated: June 23, 2014 01:31 IST2014-06-23T01:10:24+5:302014-06-23T01:31:04+5:30

मदतीसाठी हात सरसावले : प्रियांका चोप्राने मुलीच्या शिक्षणाचा भार उचलला

Carivadeswell for parab families | परब कुटुंबियांसाठी कारिवडेवासीय एकत्र

परब कुटुंबियांसाठी कारिवडेवासीय एकत्र

सावंतवाडी : घरातील गरिबी, त्यातच पतीचे अपघाती निधन आणि पदरात तीन वर्षांची मुलगी, तसेच कुटुंबाचा गाडा हाकताना होणारी ओढाताण करणाऱ्या परब कुटुंबीयांना कारिवडेवासीयांनी मदतीचा हात दिला. त्यांनी परब कुटुंबाला तब्बल १ लाख ८२ हजारांची मदत दिली. तसेच अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलल्याने गावात समाधानाचे वातावरण आहे.
दीपक साबा परब यांचा अलीकडचे पनवेल येथे फणसाचा टेम्पो घेऊन जात असताना अपघाती मृत्यू झाला आणि परब कुटुंब रस्त्यावर आले. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूने गावात एकच हळहळ व्यक्त झाली. दीपक यांची तीन वर्षांची मुलगी तसेच पत्नी यांच्या भवितव्याची काळजी अनेकांना पडली होती; पण गावातीलच सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच सागर माळकर यांनी पुढाकार घेतला आणि परब कुटुंबीयांची पूर्णपणे जबाबदारी उचलली.
सावंतवाडीत तालुक्यात प्रत्येक दानशूर व्यक्तीकडून १०० ते २०० रुपये जमा करून तब्बल १ लाख ८२ हजार रुपये उभे करण्यात आले. यातील १ लाख २० हजार रुपये मृत दीपक यांच्या पत्नीच्या नावावर, तर मुलीच्या नावावर ५० हजार, तसेच दररोजच्या खर्चासाठी बारा हजार रुपये बँकेत जमा करण्यात आले. हे सामाजिक कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कृषीच्या माध्यमातूनही परब कुटुंबीयाना मदत देण्याचे ठरविले.
परब कुटुंबीयांना आणखी एक आधार मिळाला तो चोप्रा कुटुंबीयांचा. दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने कारिवडे येथे एक आलिशान घर घेतले आहे. या घराच्या माध्यमातून चोप्रा कुटुंबीयांचे नातेवाईक कारिवडे गावात येत असतात. आठ दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा हिची आई कारिवडे येथे आपल्या घरी आली होती. त्यावेळी तिला हा सर्व प्रकार समजला आणि ती एकदम हळवी झाली.
मृत दीपक यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च आपण उचलणार असल्याचे तिने सांगितले. ती मुलगी शिक्षणासाठी कुठेही गेली तरीही परब कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे, असे आश्वासनही चोपडा कुटुंबीयांनी दिले. यामुळे परब कुटुंंबीयांचा आधार गेला तरी
समाजात अजूनही दानशूर व्यक्ती आहेत. हेच या प्रकारावरून दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Carivadeswell for parab families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.