फळांच्या बाजारावरही ‘विदेशी’चा कब्जा
By Admin | Updated: January 10, 2015 00:23 IST2015-01-09T23:08:32+5:302015-01-10T00:23:20+5:30
खप वाढला : रत्नागिरीकरांच्या जीवनसत्त्व वाढीला परदेशी आशीर्वाद

फळांच्या बाजारावरही ‘विदेशी’चा कब्जा
रत्नागिरी : अननस, कलिंगड, पपईसोबत विविध फळांचे काप एका डिशमध्ये आकर्षक पध्दतीने मांडून विकले जाते. फळांमध्ये असलेली जीवनसत्त्वे शरीरास पोषक ठरतात. त्यामुळे मुंबई, पुणे नव्हे; तर छोट्या मोठ्या शहरातही फ्रूट स्टॉलवर ग्राहकांची गर्दी दिसून येते. देशभरातून विविध प्रकारची फळे बाजारपेठेत विक्रीस येत असली तरी विदेशी फळांनी बाजारपेठेवर कब्जा केल्याचे दिसून येत आहे. इतर बाबींप्रमाणेच फळबाजारावरही विदेशी पगडा असल्याचे दिसून येते.
प्रत्येक फळाचा रंग, चवीबरोबर गुणधर्मातही वैविध्य दिसून येते. देशभरात विविध राज्यात फळांचे उत्पादन घेण्यात येत असले तरी परदेशातील अनेक फळे रत्नागिरीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. फ्रूटस्टॉलवाले माल आकर्षक पध्दतीने मांडून ठेवतात. फळाचे काप आकर्षकरित्या मांडून त्यावर चाट मसाला मारून विकण्यात येते. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक मंडळी ज्यावेळी डबा नसेल त्यावेळी तर अवश्य फळांचा स्वाद घेतात. जेणेकरून शरीरास आवश्यक असणारी कार्बोदके उपलब्ध होतात.सध्या बाजारात फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. नागपूरच्या संत्र्यांबरोबर चीनची संत्रीदेखील विक्रीस आली आहेत. आकाराने लहान शिवाय चवीलाही आंबटगोड असणारी संत्री २०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. आकाराने लहान असल्याने एका किलोमध्ये भरपूर येतात. त्यामुळे चीनच्या संत्र्यांना रत्नागिरीच्या बाजारपेठेत विशेष मागणी दिसून येत आहे.
इटलीचे किवी बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. चिकूसारखे दिसणारे हे फळही चवीने गोड आहे. ६० रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. गुलाबी रंगाचे वॉशिग्टनचे सफरचंद ग्राहकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. चवीलादेखील गोड आहे. याशिवाय ग्रीन अॅपल तर फारच सुंदर दिसते. याशिवाय न्युझीलंडचे सफरचंद देशी सफरचंदासारखेच दिसते. मात्र, आकाराने थोडे लांबट आहे. नासपती अर्थात् पेर आंबटगोड चवीचे आहे. देशी पेरपेक्षा न्युझीलंडचे पेर आकाराने मोठे व चवीलाही अप्रतिम आहे. याशिवाय गोड चिंच थायलंडहून आयात केली जाते. ३६० रूपये किलो दराने चिंचेची विक्री सुरू असली तरी पाव किलोचे आकर्षक बॉक्स विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच इराणचा काळा खजूरही विक्रीस उपलब्ध आहे. ३८० रूपये किलो दराने खजूर विक्री सुरू आहे. परंतु १९० रूपये दराने अर्धा किलोचे खजुराचे आकर्षक बॉक्स विक्रीला उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे डाळिंब, द्राक्ष, काळी सिडलेस द्राक्ष, पपई, कलिंगड, चिकू, मोसंबी, केळी, अननसदेखील विक्रीस उपलब्ध आहेत. सध्या लालबुंद मोठी डाळिंब २२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. काळी सीडलेस तसेच हिरवी द्राक्षेही विक्रीस उपलब्ध आहेत. चालू हंगामातील सुरूवातीची द्राक्षे असल्याने गोड कमी, आंबटच अधिक आहेत. देशी पपई बाजारात विक्रीला उपलब्ध असला तरी त्याची जात मात्र तैवानी आहे. आकाराने मोठे, हिरवट नारंगी रंगाचे पपई ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पपईमुळे रक्तातील प्लेटलेटस् वाढत असल्याने पपईला अधिक मागणी दिसून येत आहे.
कलिंगड उष्णतावर्धक असल्याने कलिंगडाला प्रत्येक सिझनमध्ये मागणी होते, शिवाय ते उपलब्धही होते. गावठी कलिंगड फेब्रुवारी, मार्चपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चिकू व मोसंबीचा खपही नियमित होत आहे.
वेलची केळी ६० रूपये, तर हिरव्या सालीची केळी ४० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गावठी अननसदेखील विक्रीस आले आहेत. ३० ते ४० रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. फळे दिसायला आकर्षक असल्याने ग्राहक चटकन आकर्षिला जातो. (प्रतिनिधी)
ग्राहकांकडून विदेशी फळांना मागणी
रत्नागिरीतही चवीने खाणारी मंडळी असून, त्यासाठी कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शवितात. मुंबई बाजारपेठेत विदेशी फळे विक्रीस उपलब्ध होतात. ग्राहकांच्या मागणीवरूनच मुंबईतून फळे विक्रीस आणू लागलो. पेर, किवी, ग्रीन अॅपल, ड्रगन फ्रूट, चिंच, सफरचंद, खजूर मागणी होत असल्याने वाशी मार्केटहून विविध प्रकारची फळे मागविताना विदेशी फळेही आयात करतो. विविध कंपन्या तसेच कार्यालयात परराज्यातील अधिकारी, कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. त्यामुळे या मंडळींबरोबर स्थानिक मंडळीही विदेशी फळांची मागणी करतात. देशी फळांबरोबरच विदेशी फळांचा खप सुरू आहे.
- चंद्रकांत श्रीनाथ,
फळविके्रेते, मारूती मंदिर, रत्नागिरी.
प्रत्येक फळ चवीने, गुणधर्माने वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याला मागणी केली जाते. रमजान व श्रावण हे दोन्ही महिने व्रतवैकल्याचे असल्याने फळांना मागणी वाढते, पर्यायाने किमतीही वाढतात. परंतु फळांसाठी हात आखडता न घेता फळे खरेदी केली जातात. हातगाड्या, स्टॉलवर फळे सर्रास उपलब्ध होत असली तरी विदेशी फळे विकणारे ठराविकच विक्रेते आहेत.
- एस. एच. काझी, ग्राहक, रत्नागिरी