प्रचारफेरी : शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री केसरकर यांचा सहभाग

By Admin | Updated: October 30, 2015 22:40 IST2015-10-30T22:40:40+5:302015-10-30T22:40:40+5:30

वैभववाडीत युतीचे शक्तिप्रदर्शन

Campaigning: Education Minister Tawde, Guardian Minister, Kesarkar | प्रचारफेरी : शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री केसरकर यांचा सहभाग

प्रचारफेरी : शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री केसरकर यांचा सहभाग

वैभववाडी : नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेने आपल्या दोन मंत्र्यांना प्रचारात उतरवून महायुतीने वैभववाडीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युतीच्या उमेदवारांसमवेत ढोलताशांच्या गजरात शहरात प्रचारफेरी काढून शहराच्या विकासासाठी युतीच्या हाती नगरपंचायतीची सत्ता देण्याचे मतदारांना आवाहन केले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे हेलिकॉप्टरने दुपारी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर आगमन झाले. तेथे पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयेंद्र्र रावराणे आदींनी मंत्री तावडे यांचे स्वागत केले. तेथून लगेच युतीच्या प्रचार फेरीला प्रारंभ झाला. प्रभाग दोन माईणकरवाडी येथे चहापान उरकल्यावर प्रचार फेरी वैभववाडी शहरात आली. शहरातील व्यापारी मतदारांना साद घालत मंत्रीमहोदय प्रभाग सहा मधून थेट सज्जनराव रावराणे यांच्या घरी पोहोचले. तेथे मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्याही तावडे, केसरकर यांनी समजून घेतल्या.
प्रभाग अकरा, बारा, आठमधून प्रचार फेरी पुन्हा मुख्य बाजारपेठेत दाखल झाली. केंद्र्र आणि राज्य सरकारने वर्षभरात घेतलेल्या लोकोपयोगी आणि महत्वाकांक्षी निर्णयांची पत्रके युतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांना वाटली. ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत निघालेल्या युतीच्या प्रचारफेरीने वैभववाडी शहर दणाणून गेले होते. शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री केसरकर या दोन मंत्र्यांसह आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत काढलेल्या प्रचार फेरीमुळे शिवसेना, भाजप व आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.
युतीच्या प्रचारफेरीत भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजू शेटये, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड हर्षद गावडे, जयेंद्र रावराणे, अशोक रावराणे, सुहास सावंत, राजेंद्र्र राणे, संजय रावराणे, उत्तम सुतार, मंगेश लोके, नंदू शिंदे, श्रीराम शिंगरे, शंकर नारकर व युतीचे उमेदवार आणि शिवसेना, भाजप, आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचार
फेरीचा समारोप करुन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री दीपक केसरकर हेलिकॉप्टरने दोडामार्गला निघून गेले.
(प्रतिनिधी)

Web Title: Campaigning: Education Minister Tawde, Guardian Minister, Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.